![]()
स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्यासाठी विविध पिढ्यांतील लेखिकांनी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. स्त्रियांचे अधिकार, विकास आणि सक्षमीकरण यांचे प्रतिबिंब साहित्यातून उमटले पाहिजे. बदलत्या सामाजिक आणि डिजिटल वास्तवात ज्येष्ठ व नवोदित लेखिकांमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न स्त्रीवादी साहित्य संमेलनातून केला जाणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (२४ ऑक्टोबर) पुण्यात स्त्रीवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील के. बी. जोशी सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संमेलन होईल. ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन संमेलनाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे आणि योगेश सोमण यांनी ही माहिती दिली. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयोजित ९९ नांदी संमेलनांच्या उपक्रमांतर्गत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनात दुपारी कवयित्री संमेलन, ‘माध्यमातील स्त्रीवादाचा आविष्कार’ हा परिसंवाद आणि ‘मी का लिहिते?’ या विषयावर लेखिकांशी संवाद होणार आहे. लेखनाची प्रेरणा, अभिव्यक्तीतील अडथळे, माध्यमांमधील स्त्रीप्रतिमा आणि बदलत्या काळातील स्त्रियांचे अनुभव यांवर चर्चा होईल. स्त्री लेखिकांचे जीवनचरित्र व साहित्यिक योगदान उलगडणारे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. सुमारे २०० निमंत्रित प्रतिनिधी सहभागी होतील. चर्चांचे चित्रीकरण, थेट प्रक्षेपण आणि शक्यतेनुसार दस्तावेजीकरण केले जाणार आहे. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचे भान राखून नांदी संमेलने साधेपणाने व काटकसरीने आयोजित केली जातील; मात्र साहित्यिक दर्जाशी तडजोड केली जाणार नाही, असे योगेश सोमण यांनी सांगितले.
Source link
स्त्रीवादी साहित्य संमेलनातून लेखिकांचा संवाद घडणार:डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन; 24 ऑक्टोबरला पुण्यात संमेलन, डॉ. छाया महाजन अध्यक्ष