Headlines

हिंगोलीत धक्कादायक प्रकार!:परवानगीशिवाय उभारले 2 रोहित्र, 500 मीटर वीजवाहिनी; दोन जणांवर गुन्हा दाखल




हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात वीज वितरण व्यवस्थेतील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. उमरदरी आणि आडोळ शिवारात कोणतीही अधिकृत मंजुरी नसताना 63 केव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र आणि सुमारे 500 मीटर लांबीची वीजवाहिनी उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महावितरणच्या तपासणीत हा प्रकार उघड झाल्यानंतर एका शेतकऱ्यासह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात वीज कंपनीतील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंजुरी नसतानाही सुरू होते काम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील उमरदरी आणि आडोळ परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतात रोहित्र उभारून उच्चदाब आणि लघुदाब वीजवाहिन्यांचे काम सुरू असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रोहित्र मंजूर झालेले नव्हते. याची खात्री करण्यासाठी सेनगाव वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता नितीन परळकर यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तपासादरम्यान दोन्ही ठिकाणी 63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र आणि वीजवाहिन्या उभारण्यात आल्याचे आढळून आले. मात्र, त्या वेळी कामाच्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. वरिष्ठ कार्यालयातूनही मंजुरी नसल्याचे स्पष्ट यानंतर महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेण्यात आली असता, संबंधित दोन्ही ठिकाणांसाठी कोणतीही अधिकृत मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता नितीन परळकर यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी खिल्लार येथील शेतकरी उत्तमराव शिंदे आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांवरही संशय या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात रोहित्र आणि वीजवाहिनीचे साहित्य संबंधित व्यक्तींना मिळाले कसे? जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना खराब झालेले रोहित्र बदलण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी 8 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागते, अशा परिस्थितीत अनधिकृत कामासाठी दोन रोहित्र आणि शेकडो मीटर वीजवाहिनी उपलब्ध होणे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. यामुळे या संपूर्ण प्रकारात महावितरणमधील काही कथित कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार पवन चाटसे आणि सुभाष चव्हाण करत असून अनधिकृत वीज यंत्रणा उभारण्यासाठी साहित्य कुठून आणले गेले आणि यामागे नेमके कोणाचे रॅकेट कार्यरत आहे, याचा शोध घेतला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *