Headlines

तुकाराम मुंढेंच्या विरोधात व्यापाऱ्यांची बैठक:सुट्टे खाद्यतेल विक्री बंदीवरून आक्रमक; राज्य सरकारला 15 दिवसांचा 'अल्टिमेटम'




अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात सुट्टे खाद्यतेल विकण्यावर आणि खरेदी करण्यावर बंदी घालण्याचे कडक आदेश दिले आहेत. मात्र, त्यांच्या या निर्णयाला राज्यभरातील खाद्यतेल व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या निर्णयाच्या विरोधात नाशिकमध्ये राज्यातील व्यापाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला पंधरा दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला असून, सरकारने यावर तोडगा न काढल्यास या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. व्यापाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी मुंढे यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पंधरा दिवसांत हा सुट्टे तेल विक्री बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. वेळ पडल्यास थेट न्यायालयात दाद मागण्याबरोबरच केंद्र सरकारकडेही याप्रश्नी पाठपुरावा केला जाईल, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन केल्यास दहा लाख रुपयांचा दंड आणि कारावासाची शिक्षा अत्यंत अन्यायकारक असून, आम्ही काय अतिरेकी आहोत का? असा संतप्त सवालही खाद्यतेल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. नियम मोडल्यास कठोर कारवाईचा बडगा दुसरीकडे, तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा भेसळ आढळल्यास सात वर्षांपासून ते थेट जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच, भेसळ केल्यास आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. ग्राहकांनी सुट्टे तेल अजिबात खरेदी करू नये, त्याऐवजी पॅकेज्ड तेल घेताना त्याचे लेबल, सील आणि ‘एक्सपायरी डेट’ (मुदत) तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्याशी खेळ आणि गंभीर आजारांचा धोका सुट्ट्या आणि भेसळयुक्त तेलाचा मुद्दा केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून, तो थेट नागरिकांच्या आरोग्याशी जोडला गेला आहे, याकडे मुंढे यांनी लक्ष वेधले. अशा भेसळयुक्त तेलाच्या वापरामुळे कर्करोग, मेंदूचे विकार आणि उच्च रक्तदाब यांसारखे गंभीर आजार बळावण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे आरोग्याशी खेळणारे तेल टाळावे. तसेच, एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल घरी वारंवार वापरू नये आणि हॉटेलमध्येही जर तेच तेल पुन्हा पुन्हा वापरले जात असेल, तर तिथे खाणे टाळावे, अशी महत्त्वाची माहिती देत तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सतर्क केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *