Headlines

वृद्ध कलावंतांची निवड वर्षभरापासून रखडलेलीच:जुलै 2025 मध्ये अर्ज केलेल्यांसाठी बैठक केव्हा घेणार, संबंधितांचा सवाल




अमरावती जिल्ह्यातील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज केलेल्या शेकडो वृद्ध कलावंतांची निवड प्रक्रिया वर्षभरापासून रखडली आहे. निवड समितीची बैठक न झाल्याने मानधनही मिळालेले नाही. यामुळे कलावंतांमध्ये नाराजी असून, तातडीने बैठक घेऊन निवड जाहीर करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत दरमहा ५ हजार रुपये मानधन दिले जाते. जिल्ह्यातील अनेक वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी जुलै २०२५ मध्ये या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केले होते. शासनाच्या नियमानुसार, जिल्हा निवड समितीची बैठक घेऊन मार्च २०२६ पर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निवड समितीच्या बैठकीअभावी शेकडो प्रस्ताव प्रलंबित आहेत. जुने प्रस्ताव जुन्याच निवड समितीद्वारे निकाली काढण्यात यावेत, अशी मागणी कलावंतांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले असून, जिल्हा कचेरीतील अधीक्षकांना माहिती देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात जुनी निवड समिती अस्तित्वात आहे, परंतु शासनाने त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या समितीचे गठन वेळेत न झाल्याने ही कोंडी निर्माण झाली आहे. कलावंतांच्या मते, त्यांनी जुनी समिती अस्तित्वात असताना अर्ज केले होते, त्यामुळे त्या अर्जांवर जुन्याच समितीने निर्णय घ्यावा. नव्या समितीची प्रतीक्षा नव्याने प्राप्त होणाऱ्या अर्जांसाठी करावी, जेणेकरून कलावंतांवर अन्याय होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आता जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *