Headlines

पायाच्या असह्य वेदनेला कंटाळून:तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या




मोर्शी तालुक्यातील खेड येथे एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. आशिष दिगंबर मडावी असे मृत तरुणाचे नाव आहे. पायाच्या असह्य वेदनेला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष दिगंबर मडावी याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. वयाच्या २२ व्या वर्षी मिस्त्रीकाम करताना तो पडल्याने ही दुखापत झाली होती. त्यावेळी पायावर योग्य उपचार न झाल्याने कालांतराने त्याचा पाय कापावा लागला, ज्यामुळे तो अपंग झाला होता. आशिषला पायाच्या असह्य वेदना सतत होत होत्या आणि त्यामुळे तो नेहमी रडत असे. शनिवारी तो कृषी केंद्रात कामाला गेला होता. दुपारी १२ वाजता कामावरून घरी परतल्यानंतर त्याने जेवण केले आणि झोपी गेला. त्यावेळी घरातील इतर सदस्य शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणी नसताना आशिषने घरातील लाकडी मयालीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मोर्शी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मोर्शी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *