Headlines

अमरावती, तिवसात 25 दिवसांनी पावसाचे पुनरागमन:वातावरणात गारवा; पिकांनाही दिलासा




अमरावती जिल्ह्यात २५ दिवसांच्या दीर्घ खंडानंतर पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दुपारी अमरावतीत तर शनिवारी रात्री तिवसा तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पाऊस झाला होता, त्यानंतर पावसाने पूर्णपणे ओढ दिली होती. या काळात शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या पिकांची स्थिती चिंताजनक बनली होती. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. आजच्या पावसाने पिकांची तहान पूर्ण झाली नसली तरी त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तिवसा शहर परिसरात शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता सुरू झालेला पाऊस सुमारे एक तास सुरू होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अमरावतीत रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी १० वाजता तुरळक सरी कोसळल्या. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाने चांगलाच जोर पकडला आणि सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला. रविवार सुटीचा दिवस असल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. रेनकोट किंवा छत्र्या नसलेल्यांना अचानक आलेल्या पावसामुळे त्रास झाला. विशेष म्हणजे, तिवसा शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला असला तरी, त्याचवेळी मोझरीसह इतर काही परिसरात पाऊस झाला नाही. यामुळे एकाच तालुक्यात पावसाची असमानता दिसून आली, ज्यामुळे काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी चिंतेचे वातावरण होते. हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा मार्गे वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. मान्सूनची ट्रफरेषा उत्तर भारतात सक्रिय असली तरी, शियर झोन मध्य भारतावरून गेल्याने अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पुढील पाच ते सहा दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *