Headlines

पैठण तालुक्यात 17 % खरिपाची पेरणी:कापूस, तूर, सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल‎




पैठण मान्सूनचे आगमन होऊन जवळपास महिना होत आला आहे, तरीही पैठण तालुक्यात अद्याप पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. जून महिना संपत आला तरी अनेक गावांमधील शिवारे कोरडीठाक आहेत. अशा परिस्थितीतही तालुक्यातील काही बागायतदार शेतकऱ्यांनी मोठा धोका पत्करत खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे १७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली. दरम्यान, सिंचनाची सोय नसलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी मात्र अद्याप पेरणीला प्रारंभ केलेला नसून, ते दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पैठण तालुक्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि बाजरी ही प्रमुख खरीप पिके घेतली जातात. गोदावरी नदीच्या पट्ट्यातील काही भागांत विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांनी कपाशी व तुरीची पेरणी उरकून घेतली आहे. आजवर तालुक्यात ६०० हेक्टरच्या जवळपास ही पूर्वमोसमी पेरणी झाली आहे. सध्या तालुक्यातील सर्वच शिवारांमध्ये उन्हाळी मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. हवामान विभागाने मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. आगामी १५ दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रखडलेल्या पेरण्यांना गती मिळेल. अन्यथा पेरणीचे नियोजन, पीक निवड आणि उत्पादनाचा अंदाज यावर परिणाम होऊ शकतो, असे कृषी अधिकारी विकास पाटील यांनी स्पष्ट केले. एक चांगला पाऊस झाला की शिवार हिरवेगार होईल, अशी आशा शेतकरी बाबासाहेब मगरे यांनी व्यक्त केली आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी १५ जुलैपर्यंतचा कालावधी अद्यापही अनुकूल मानला जातो. त्यामुळे पुढील दोन ते तीन आठवड्यांत चांगला पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्या वेगाने पूर्ण होऊ शकतात. उशिरा पेरणी झाल्याने उत्पादनात मोठी घट होईल असे चित्र सध्या तरी नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *