![]()
विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीपासून ते मुद्रांक शुल्क घोटाळा, स्मार्ट मीटर, शासकीय जमिनींची लूट, SRA आणि AMRUT योजनेतील कथित अनियमितता अशा अनेक विषयांवर सरकारला धारेवर धरले. विधानसभेत आज विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर भाषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव आले आहेत, त्यामुळे जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव आल्यास त्यावेळी ब्रह्मपुरीचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या शिष्यवृत्तीधारक मृण्मय जाधव या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मंजूर असूनही फी आणि लिव्हिंग अलाउन्स न मिळाल्याने त्याच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्याची मानसिक स्थिती ढासळली आहे, असे वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले. या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सरकारने तातडीने मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करावी, अशी मागणी त्यांनी केली. वाढलेल्या बिलांमुळे जनता त्रस्त एकीकडे सरकार सांगते की स्मार्ट मीटर ही जबरदस्ती बसवण्यात येणार नाही. पण अनेक ठिकाणी जबरदस्ती मीटर बसवण्यात आले. त्यानंतर वीजबिले प्रचंड वाढल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत. वाढलेल्या बिलांमुळे जनता त्रस्त आहे, सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली. मुंबईतील घटना, मिसिंग लिंकवरून सवाल मुंबई महापालिकेच्या मुदतठेवींमध्ये एका वर्षात सुमारे ४ हजार कोटी रुपयांची घट झाल्याचा मुद्दा उपस्थित करत हा पैसा नेमका कुठे खर्च झाला? मुंबईत पहिल्याच पावसात अनेक मृत्यू, मॅनहोल दुर्घटना, झाडे पडण्याच्या घटना घडत असताना एवढा निधी खर्च होऊनही नागरिकांना सुविधा का मिळत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात अनेक तक्रारी समोर येत असल्याचे सांगत संबंधित कंत्राटदारांच्या कामाबाबत अनेक तक्रारी असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. कोकणात बेकायदेशीर उद्योग उभारण्यात आलेत उरण, पनवेल आणि पेण परिसरात JNPT च्या नावाखाली शासकीय जमिनींवर भू-माफिया, काही अधिकारी आणि स्थानिक प्रभावशाली घटकांच्या संगनमताने बेकायदेशीर उद्योग उभारण्यात आल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. या माध्यमातून दरमहा ५० ते १०० कोटी रुपयांची काळी कमाई होत असल्याचा दावा करत संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. बोगस झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून हजारो कोटींचा गैरव्यवहार दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात इंदिरा आवास योजनेतील सुमारे ५० घरे जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित शिर्डी मुख्याधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कोथरूड SRA प्रकरण, पिंपरी-चिंचवडमधील TDR घोटाळे आणि बोगस झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून हजारो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणात ही स्वतंत्र चौकशीची मागणी त्यांनी केली. अमृत योजनेवरून सवाल AMRUT योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे सांगत या योजनेचा राज्यव्यापी आढावा घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अस वडेट्टीवार म्हणाले. महसूल सेवकांचे मानधन किमान २५ हजार रुपये प्रतिमहिना करावे तसेच आरक्षण कायम ठेवून त्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. गडचिरोली-चंद्रपुरातील उद्योगांवरून सरकारला सवाल गडचिरोली-चंद्रपूर परिसरात अनेक उद्योग येत आहेत. चंद्रपुर गोंडपिंपरी इथे MIDC येत आहे. पण त्यातही सुपीक जमीन घेण्यात येत आहे. याला स्थानिकांनी विरोध केला आहे. स्थानिक आमदाराला गावबंदी करण्यात आली आहे. गडचिरोली विमानतळ प्रकल्पांसाठी सुपीक जमीन संपादित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. उद्योगांना जमिनी हवे तर वन विभागाची जमीन हवी पण सुपीक जमीन घेतल्याने जनतेचे नुकसान होत आहे, त्यांना आता तात्पुरती नोकरी मिळेल पण उद्योग बंद झाले की पुढे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील बेकायदा दस्तनोंदणी आणि मुद्रांक शुल्कातील कथित हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करून संबंधित अधिकारी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. विरोधकांच्या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारने या सर्व प्रश्नांची केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घ्यावेत आणि संबंधित प्रकरणांमध्ये पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात केली. हे ही वाचा… कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला:विधानसभेत भावुक झाले राम कदम, कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत अत्यंत भावनिक पद्धतीने उपस्थित केला. आपल्या आईचे निधन फुफ्फुसांच्या इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) या गंभीर आजारामुळे झाल्याचे सांगताना ते भावुक झाले. कबुतरांच्या विष्ठेमुळे (ड्रॉपिंग्ज) हवेत पसरणाऱ्या घटकांमुळे हा आजार बळावतो, असा दावा करत त्यांनी सरकारने तज्ज्ञ समिती नेमून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. सविस्तर वाचा… जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 50 लाखांचा ‘रेट’?:विधान परिषदेत अनिल परबांचा गंभीर आरोप; भाजप आमदारानेही दिला दुजोरा मुंबईत नगरसेवक होण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. जात पडताळणी समितीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांचा ‘रेट’ असल्याचा दावा करत त्यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याचे सांगत काही प्रमाणात या आरोपांना दुजोरा दिला. सविस्तर वाचा…
Source link
ब्रह्मपुरी वेगळा जिल्हा करण्यात यावा:सरकारकडे सकारात्मक प्रस्ताव; स्मार्ट मीटरमुळे जनता त्रस्त, सरकारने लक्ष द्यावे – विजय वडेट्टीवार