![]()
मागील 2-3 वर्षांत जे काही घडले त्यामुळे माझ्या कर्तव्यात कोणताही बदल झाला नाही. मी जात, पात, धर्म सोडून राजकारण झाले. पण अखेर मला लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दांत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानने मराठा भवनासाठी तब्बल 28 गुंठे जमीन उपलब्ध करून दिली आहे. या प्रकरणी मराठा युवा मंचाने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी उपरोक्त भावना व्यक्त केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जे वातावरण होते, तेच वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्षे राहिले. पण मधल्या काळात काही गोष्टी झाल्या. त्याची चर्चा आता करू नये. पण मराठा भवनाचा विषय माझ्यासाठी आत्मियतेचा होता. तुम्ही माझ्यावर प्रेम केले. मी सुद्धा माझ्या कर्तव्यात काहीही बदल केला नाही. मी जात, पात, धर्म सोडून राजकारण केले. पण मलाच लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला. मी ताकाला जाऊन भांडे लपवत नाही धनंजय मुंडे म्हणाले, घडलेल्या काही गोष्टी तात्पुरत्या असतात. आंदोलनेही तात्पुरती असतात. एखाद्या विषयीची चुकीची भावनाही तात्पुरती असते. आज ना उद्या खरे काय ते समजेलच. त्यामुळे मी दीड वर्षे शांत होतो. पण माझा नियतीवर फार विश्वास आहे. माझी नियत साफ राहिली, तर माझ्या बाबतीत जो गैरसमज झाला, तो नियतीच दुरुस्त करेल हे मला माहिती आहे. त्यामुळे आज हे सगळे नियतीनेच घडवून आणले. तालुका पातळीवरील 28 गुंठ्यांवरील हे पहिलेच मराठा भवन असेल. या वास्तूची एकेक वीट रचेपर्यंत तसेच ते पूर्ण होईपर्यंत कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. मी ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. जे मनात आहे, तेच ओठांवर आहे. जे ओठांवर आहे, तेच माझ्या मनात आहे. आम्ही मराठा समाजाला दिलेली जागा डेव्हलप करून देऊ. परळीत होणाऱ्या कृषी कॉलेजचे काम पुढच्या 50 वर्षांचा अंदाज घेऊन केले जात आहे. तशाच पद्धतीचे काम मराठा भवनाचे होईल. यापूर्वी अनेकदा गार्डनमध्ये बैठका घ्यावा लागत होत्या. मला ते पाहावत नव्हते. एकालाच व्हिलन ठरवू नका धनंजय मुंडे यांनी यावेळी जनतेला कुणालाही व्हिलन न ठरवण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, विरोध हा राजकीय व वैचारिक असावा. पण शहराच्या विकासासाठी सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. कुणाला एकालाच व्हिलन ठरवू नका. सर्वांनी चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट म्हटले पाहिजे. त्यावेळी वातावरण तसे तयार झाले होते. काही गैरसमज निर्माण झाले होते. एक भावनिक वातावरण होते. पण आता आपल्याला नव्याने सर्वांना सोबत घेऊन विकासाचे काम करायचे आहे.
Source link
मला लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला:धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत; मराठाला भवनासाठी उपलब्ध करून दिली 28 गुंठे जमीन