![]()
महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीतील एक अभ्यासू, लढाऊ आणि निःस्वार्थी विचारवंत अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लक्षावधी कष्टकरी, शेतकरी आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारा एक बुलंद आवाज शांत झाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ लातूर जिल्ह्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असून सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात १९४६ मध्ये शिवाजीराव शिंदे यांचा जन्म झाला. ग्रामीण भागात वाढलेल्या शिवाजीरावांनी विद्यार्थी दशेपासूनच अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि समाजवादी विचारसरणीचा स्वीकार केला. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ प्रा. ना. य. डोळे, डॉ. बाबा आढाव, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि भाई वैद्य यांच्यासारख्या दिग्गजांच्या थेट मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिले होते. ऐतिहासिक चळवळींचे सारथ्य आणि पक्षसंघटना शिवाजीराव शिंदे यांनी जनता दलाचे राज्य सरचिटणीस म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि पक्षसंघटना तळागाळापर्यंत मजबूत केली. त्यांच्यातील अफाट संघटन कौशल्यामुळेच राष्ट्रीय पातळीवरही त्यांची मोठी ओळख निर्माण झाली होती. ऐतिहासिक पदयात्रेचे व्यवस्थापन माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी काढलेल्या प्रसिद्ध ‘दिल्ली ते कन्याकुमारी’ भारत पदयात्रेच्या मुख्य व्यवस्थापनाची अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. डॉ. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीत त्यांनी अग्रभागी राहून काम केले. यासोबतच दलित, आदिवासी आणि उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. १९९५ मध्ये लातूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष असताना त्यांनी पक्षाला जिल्ह्यात ऐतिहासिक यश मिळवून दिले होते. सत्तेचा मोह टाळणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व शिवाजीराव शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अनेकदा राज्यसभा, विधानसभा किंवा विधानपरिषदेवर जाण्याच्या थेट संधी उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, वैयक्तिक सत्तेचा व पदांचा मोह टाळत त्यांनी नेहमीच आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना पुढे केले आणि त्यांना आमदार-खासदार बनवले. याच निस्पृह वृत्तीमुळे राजकारणात त्यांची ओळख ‘किंगमेकर’ म्हणून दृढ झाली होती. त्यांच्या या निगर्वी आणि अभ्यासू स्वभावामुळेच माजी पंतप्रधान चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अशा महाराष्ट्रातील सर्वच बड्या नेत्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील एक आदर्श पर्व संपले आहे.
Source link
महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीचा चेहरा हरपला!:ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांचे निधन, राज्यसभेची संधी धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत