![]()
उन्हाळा आणि शाळेच्या सुट्ट्या संपून जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला, तरीही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशू-पक्षीही चिंतेत होते. हवामान खात्याचे अंदाज सतत पुढे ढकलले जात असले तरी, आता 25 जूननंतर राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन होईल असा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, भिवंडी, सातारा आणि कोकणातील काही भागांत पावसाने हजेरी लावल्यामुळे, चातकासारखी वाट पाहणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते आणि साधारण चार वाजेच्या सुमारास हडपसर, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा आणि कोथरूड या भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेले काही दिवस जाणवणाऱ्या प्रचंड उकाड्यानंतर या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. मात्र, या पहिल्याच पावसात स्वारगेट परिसरातील मित्र मंडळ चौकाला तलावाचे स्वरूप आल्याने पादचारी मार्ग पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड भागात केवळ हलक्या सरी कोसळत असून, तिथल्या नागरिकांना अद्यापही जोरदार मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे. साताऱ्यात पावसाची एन्ट्री पुण्यासह मुंबई, कोकण आणि साताऱ्यातही पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. विशेषतः सातारा जिल्ह्याच्या पश्चिम ग्रामीण भागात आणि परळी खोऱ्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाने दमदार बॅटिंग केली. अचानक सुरू झालेल्या या तुफान पावसामुळे नागरिकांची थोडी तारांबळ उडाली असली तरी, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाअभावी रखडलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे आता वेगाने मार्गी लागणार असल्याने, पावसाच्या या दमदार एन्ट्रीमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत. चिपळूणमध्ये दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाची हजेरी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये तब्बल दहा ते पंधरा दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार पुनरागमन केले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे धोक्यात आलेल्या भातशेतीला या पावसामुळे नवी संजीवनी मिळाली असून, चिंतेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाने आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही या पावसामुळे सुखद गारवा अनुभवता आला आहे. महाडसह दक्षिण रायगडमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी मध्य रायगडमध्ये हजेरी लावल्यानंतर मान्सूनने आपला मोर्चा दक्षिण रायगडकडे वळवला असून, महाडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर अखेर पावसाने दमदार बॅटिंग करत हजेरी लावली. सततचा उकाडा आणि कडक उन्हामुळे हैराण झालेल्या महाडमधील नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात आल्हाददायक बदल झाला आहे. खेडमध्ये वरुणराजासाठी जांभळेश्वराला साकडे आणि जलाभिषेक रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर खेड येथे सकल हिंदू समाज आणि शिवभक्त समितीच्या वतीने जोरदार पर्जन्यवृष्टीसाठी विशेष धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले. शिवभक्तांनी खेडजाई-रेडजाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर जांभळेश्वर महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला. तसेच, महादेवाला प्रतीकात्मक स्वरूपात पाण्यात कोंडून लवकरात लवकर पाऊस पाडण्याचे साकडे घालण्यात आले. ‘महादेव भक्तांच्या हाकेला नेहमीच धावून येतात’, असा विश्वास यावेळी पुजारी दिलीप मोकाशी यांनी व्यक्त केला असून, विविध देवतांच्या आरतीने या विधीची सांगता झाली.
Source link
राज्यात मान्सूनची दमदार एन्ट्री!:पुणे, सातारा ते कोकणापर्यंत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा