![]()
अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाल्याने भातकुली आणि मोर्शी तालुक्यात मोठे नुकसान झाले. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीसोबतच अनेक घरांनाही फटका बसला. भातकुलीत काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. मोर्शी तालुक्यात गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे अनेक भागांत झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली. यामुळे विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत अंधार आणि उष्णतेचा सामना करावा लागला. भातकुली शहर आणि परिसराला शुक्रवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमारास चक्रीवादळ, गारपीट आणि पावसाचा जोरदार फटका बसला. मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या विजेच्या तारांवर व खांबांवर पडल्याने खांब वाकले. शांतीनगरलगत असलेल्या गौरक्षणातील टीनपत्रे उडून आल्याने शांती नगरातील अनेक घरांचे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहरातील रस्त्यांवर पडलेली झाडे आणि फांद्या उचलण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरण कंपनीकडूनही खांब व तारांवरील फांद्या हटवून तुटलेल्या तारा जोडण्याचे काम केले जात आहे. चक्रीवादळामुळे कोदलेश्वर मंदिर, इदगाहची भिंत, मशीदीवरील मिनार आणि गौरक्षण सेटसह काही घरांच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. नुकसानग्रस्त नागरिक महसूल प्रशासनाने तात्काळ घरांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी करत आहेत. मोर्शी तालुक्यातील दाभेरी शेतशिवारात दुपारी तीनच्या सुमारास गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेड फाटा ते खेड गावाच्या रस्त्यावरील झाडे कोलमडून वाहतूक विस्कळीत झाली. काही शेतकऱ्यांच्या झोपड्यांवरील टीनपत्रे उडून गेली. दाभेरी ते तळेगाव परिसरात तुरीच्या दाण्यापेक्षा मोठ्या गारा कोसळल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा कहर सुरू होता. याच काळात काही शेतकऱ्यांच्या शेतातील झोपड्यांवरील टीनपत्रे उडाल्याने रखवालदारांचा संसार उघड्यावर आला. खासदार अमर काळे यांचे निकटवर्तीय अजीजखान पठाण यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी विनंती केली, मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. अखेरीस, खेड गावच्या युवकांनी झाडे हटवून खोळंबलेली वाहतूक पूर्ववत सुरू केली. राजुरवाडी परिसरालाही वादळासह मान्सूनपूर्व पावसाने झोडपले, जिथे झाडे उन्मळून पडली, टीनपत्रे उडून गेली आणि विद्युत खांब कोसळून नुकसान झाले. या पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.
Source link
मोर्शी, भातकुलीत गारपीट अन् वादळी पाऊस:घरांच्या भिंती पडल्या, वीज खांब वाकले; टीनपत्रे उडाली, मोठे नुकसान