![]()
राज्यातील राजकारणात सध्या विधानपरिषद निवडणुका, जागावाटप आणि सत्तासमीकरणांच्या चर्चांदरम्यान आणखी एका राजकीय हालचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यात जबाबदारी स्वीकारण्यासाठी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी पडद्यामागून लॉबिंग सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृतपणे त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ हे फक्त स्वतःसाठी राज्यसभेची संधी शोधत नाहीत, तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यसभेच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ गट अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही या हालचालींचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एका भुजबळ समर्थक नेत्याने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत पक्षातील घराणेशाहीच्या मुद्द्यावर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवार यांना खासदार करण्यात आलं, सुनील तटकरे खासदार असतानाच त्यांच्या मुलीला राज्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यात उपमुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार दिल्लीमध्ये खासदार आहे, मग इतर नेत्यांच्या कुटुंबीयांबाबत वेगळी भूमिका का घेतली जाते? असा रोखठोक सवाल या नेत्याने उपस्थित केला आहे. मात्र, या विषयावर सार्वजनिकपणे बोलण्यास त्यांनी नकार दिला. छगन भुजबळ हे सध्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांची भूमिका अनेकदा चर्चेत राहिली. विशेषतः मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती. मराठा आंदोलनाविरोधात उघडपणे बोलणारे ते महायुतीतील पहिले मोठे ओबीसी नेते ठरले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात नवे ध्रुवीकरण झाल्याचेही पाहायला मिळाले. मात्र, याच भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला काही भागात राजकीय फटका बसत असल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणं पुन्हा चर्चेत याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एका पक्ष बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. काही नेते विशिष्ट समाजाबाबत टोकाची भूमिका घेत असल्याने पक्षाची प्रतिमा बिघडते आणि त्याची राजकीय किंमत मोजावी लागते, असे अजित पवार यांनी बैठकीत म्हटल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भुजबळ आणि अजित पवार यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. आता राज्यसभेच्या जागेवरून सुरू झालेल्या नव्या राजकीय हालचालींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणं पुन्हा चर्चेत आली आहेत. पुढील काही दिवसांत पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Source link
राज्यसभेसाठी भुजबळांचे लॉबिंग? पुतण्यासाठीही मंत्रिपदाची मागणी:इतरांच्या मुलांना संधी, भुजबळांना का नाही? राजकारण पेटलं