![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांचे लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लागले आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार का? त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत असल्याने ते पुन्हा सभागृहात येतील का, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 9 नियमित जागांसह एका पोटनिवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार केला तर भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली जाणार का, यावर संपूर्ण राजकीय समीकरण अवलंबून असल्याचे मानले जाते. पक्षांतर्गत पातळीवरही त्यांनी पुन्हा विधानपरिषदेत यावे, असा दबाव असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये विधान परिषद सदस्यत्व स्वीकारले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपत असताना ते पुन्हा निवडणूक लढवतील का, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. जर त्यांनी उमेदवारी दिली, तर निवडणूक बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी भाजपचा कल राहू शकतो, असे संकेत राजकीय सूत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजपचे 231, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 40 असे एकूण भक्कम संख्याबळ आहे. या आधारावर महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांना एकच जागा निश्चित मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे, जी सध्या कठीण वाटते. उद्धव ठाकरेंचा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल, 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 2 मे रोजी छाननी होणार असून 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी होणार असून 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा निर्णय केवळ त्यांच्या राजकीय भवितव्याचाच नाही, तर संपूर्ण निवडणुकीच्या समीकरणाचा गेमचेंजर ठरू शकतो.
Source link
विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो:निवडणूक बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी भाजपचा कल