![]()
नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते प्रकाश मारोटकर आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. बंद पडलेले खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणीनुसार निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. खाजगी बाजारात ज्वारीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शासनाने हमीभावाने खरेदीसाठी पंधरा दिवसांपूर्वी हे केंद्र सुरू केले होते. खाजगी आणि शासकीय खरेदी दरात प्रति क्विंटल सुमारे ९०० रुपयांची तफावत असल्याने, ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली होती. स्थानिक खरेदी-विक्री संघाने शासनाच्या आदेशानुसार ९५ शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करून शासकीय गोदामात जमा केली होती. मात्र, काही दिवसांनी हे केंद्र बंद करण्यात आले, त्यामुळे इतर शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. केंद्र बंद पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपली ज्वारी विकली आहे, त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांच्या ज्वारी खरेदीची कोणतीही निश्चित तारीख ठरलेली नाही. शेतकऱ्यांच्या मते, काही राजकीय पदाधिकाऱ्यांमधील हेवेदाव्यांमुळे हे केंद्र बंद पडले आहे. या पदाधिकाऱ्यांनी खोटी तक्रार करून ज्वारी खरेदी केंद्र बंद पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनुसार, तलाठी आणि कृषी सहायक आता त्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी येत आहेत. २०२५ मधील पिकाची पाहणी २०२६ मध्ये कशी दिसणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. ज्वारीचे पीक निघून आता तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ खरेदी केंद्र सुरू करून खरेदी केलेल्या मालाचे चुकारे द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी प्रकाश मारोटकर यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख निलेश इखार, काँग्रेसचे सुमीत दहातोंडे, मोरेश्वर दिवटे, सुनील इंझळकर, जय ठाकरे, अंकुश बोदडे, शाम पाठक, अंबादास कुडू, अनिल ठाकरे, प्रदीप कदम, देवीदास मानके, सचिन बोरकर, सोमेश्वर रंगे, गजानन ढेरे, सागर खंडार, दिलीप कोहळे, ओम ठाकरे, ज्ञानेश्वर सरोदे, विशाल काळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, खरेदी केंद्र बंद पडण्यामागे एक वेगळे कारण समोर आले आहे. नांदगाव तालुक्यात ज्वारीचा पेरा नसतानाही खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी कशी होत आहे, असा प्रश्न काही पुढाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तक्रारदारांच्या मते, ही ज्वारी व्यापाऱ्यांची असून, तशी तक्रार तहसीलदार आणि जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
Source link
शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद:अनेक शेतकऱ्यांची ज्वारी घरी पडून; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा