![]()
वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. सुरेश बोरसे यांचा पोलिस व त्यांच्या सोबतच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मारहाणीत झालेला मृत्यू हा संतापजनक, वेदनादायी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला अल्पावधीत जामीन मिळाल्याने तपास व कारवाईच्या प्रक्रियेबाबतही शंका निर्माण होत असल्याचे दानवे यांनी या पत्रात नमूद केले आहे. वैजापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी नागरगोजे व त्यांचे सहकारी हे 302 सारख्या गुन्ह्यातील आरोपी रवी आवारे व इतरांसोबत तपासासाठी वेरूळ येथे आले होते. यावेळी सुरेश बोरसे यांनी केवळ विचारपूस केल्याने त्यांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविण्यात आले, तसेच विरोध करणाऱ्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक पोलिसांनी गणवेशाऐवजी खासगी पोशाखात येणे, तपासासाठी शासकीय वाहनाऐवजी आरोपींचे विनाक्रमांक वाहन वापरणे, बोरसे यांना वाहनात का नेण्यात आले?, त्यांच्यावर मारहाण का करण्यात आली? आणि कुटुंबीयांशी गैरवर्तन का करण्यात आले?, या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे. आरोपींवर गंभीर कलमे लावण्यात यावीत तसेच घटना 10 जून 2026 रोजी रात्री घडूनही गुन्हा दाखल करण्यास विलंब का झाला, याचाही तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. खुलताबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पुरेसा नसून, संपूर्ण घटनाक्रमाचा विचार करून गंभीर कलमे लावण्यात यावीत, अशी दानवे यांनी मागणी केली आहे. बोरसे कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे, मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिस अधिकारी नागरगोजे, रवी आवारे व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून अटक करणे, तसेच आरोपींचा जामीन रद्द करून बोरसे कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत तीव्र लढा सुरू राहील या प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा अथवा प्रकरण दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. बोरसे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत तीव्र लढा सुरू राहील, असा इशारा अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातून दिला आहे.
Source link
शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा:शिवसेना नेते अंबादास दानवेची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी