![]()
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा पडलेल्या फुटीवर अखेर आज गुरुवार 18 जून रोजी शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. आज पक्षाने बोलावलेल्या बैठकीला दांडी मारून त्यांनी व्हीपसुद्धा झुगारून लावला. त्यामुळे हे सारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले. या साऱ्या घडामोडीनंतर परभणीचे खासदार संजय जाधव यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदाराच्या या गटाने जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी झालेल्या बैठकीत पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने त्यांना केंद्रात मानाचे स्थान देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे ही संधी संजय जाधव यांना दिली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा मराठवाड्याच्या खात्यात हे केंद्रीय मंत्रिपद येण्याची चिन्हे आहेत. पक्षांतर नाट्याचा पाचवा अंक परभणी लोकसभा मतदारसंघ म्हणजे ‘शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला’ असे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. मात्र, या बालेकिल्ल्याचा एक पूर्वेतिहास पाहिला, तर खासदारकीचा कार्यकाळ सुरू असतानाच पक्षाला जय महाराष्ट्र ठोकण्याची एक नवी मालिका इथे सुरू झाल्याचे दिसते. विद्यमान खासदार संजय जाधव यांनी नुकताच घेतलेला पक्षांतराचा निर्णय हा याच परभणीच्या राजकीय शापाचा पाचवा अंक ठरला आहे. यापूर्वीच्या नेत्यांनी तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी केली होती, मात्र संजय जाधव यांनी खासदार पदावर असतानाच थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भूतकाळातील बंडखोरीचा इतिहास परभणीच्या या राजकीय इतिहासाची पाने चाळली, तर १९८९ आणि १९९१ च्या काळात अशोक देशमुख यांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाऊन तत्कालीन काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता. अविश्वास प्रस्तावाच्या वेळी पक्षादेश डावलल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर पुढे सुरेश जाधव, तुकाराम रेंगे आणि गणेशराव दुधगावकर यांनीही वेगवेगळ्या कारणांमुळे आणि तिकीट कापल्यामुळे पक्षांतर केले होते. आता याच यादीत संजय जाधव यांचे नाव पाचवे म्हणून जोडले गेले आहे. नाराजीचे नेमके कारण काय? मिळालेल्या माहितीनुसार, संजय जाधव हे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या अंतर्गत कारभारावर प्रचंड नाराज होते. परभणी महानगरपालिकेत पक्षाने यश मिळवले असले, तरी पक्षाकडून योग्य तो पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत नसल्याची त्यांची भावना होती. विकासकामांमध्ये येणारे अडथळे आणि पक्ष नेतृत्वाची अनास्था यामुळे ही दरी अधिकच रुंदावत गेली. “पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही जर साधी भेट किंवा कौतुकाची थाप मिळत नसेल, तर पुढे कसे जायचे?” अशी खदखद त्यांच्या समर्थकांमध्ये होती. जवळच्या सहकाऱ्यांना आधीच लागला होता सुगावा संजय जाधव यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेचा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांना आधीच आला होता. त्यांनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहणे टाळले होते, ज्यामुळे ते लवकरच मोठा निर्णय घेणार हे स्पष्ट झाले होते. दुसरीकडे, उद्धवसेनेने देखील या परिस्थितीचा अंदाज घेऊन परभणी जिल्ह्यात पक्षाची नवीन बांधणी आणि नवे पदाधिकारी जाहीर करत त्यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला होता. हिंगोलीमध्ये विश्वासाला तडा हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पक्षांतराचा आणि फुटीरतेचा इतिहास नवा नाही. मतदार ज्या नेत्यांना विश्वासाने निवडून देतात, तेच लोकप्रतिनिधी पुढे जाऊन मतदारांच्या विश्वासाला तडा देत असल्याचे चित्र येथे वारंवार पाहायला मिळाले आहे. आता याच परंपरेत विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाची भर पडली आहे.हिंगोलीत केवळ खासदारच नव्हे, तर माजी केंद्रीय मंत्री, आमदार आणि माजी आमदारांनीही वेळोवेळी राजकीय कोलांटउड्या मारल्या आहेत. बंडखोर आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची मोठी यादी जनसंपर्काचा अभाव आणि राजकारणावर झालेला परिणाम लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जिल्ह्याशी फारसा संपर्क ठेवला नसल्याची चर्चा आहे. मध्यंतरी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांचा कोणताही सक्रिय सहभाग किंवा रस दिसला नाही. जिल्ह्याच्या मुख्य राजकारणातून ते अंशतः लांबच राहिले, ज्याचा परिणाम आता स्थानिक राजकीय समीकरणांवर होताना दिसत आहे. तिसऱ्या सादेला दिला होकार धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत उद्धवसेनेचे खासदार फोडण्याचे दोन प्रयत्न झाले होते. मात्र, त्या दोन्ही वेळी ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट नकार दिला होता. परंतु, तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांनी काही समर्थकांच्या आग्रहाखातर होकार दिल्याचे आणि यामुळेच खासदारांच्या गटाचे हे वर्तुळ पूर्ण होऊन ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. खासदारांची भूमिका बदलली, पण आमदारांची ‘ठाकरें’शीच निष्ठा! एकीकडे खासदार ओमराजे पक्षांतराच्या उंबरठ्यावर असताना, त्यांनीच राजकीय प्रवाहात आणलेले त्यांचे सहकारी मात्र ठाकरेंसोबतच ठाम राहिल्याचे चित्र आहे. आ. कैलास पाटील: शिवसेनेमध्ये जेव्हा उभी फूट पडली होती, तेव्हा सुरतला जात असताना ओमराजेंच्या एका सांगण्यावरून अर्ध्या वाटेतून उतरून कैलास पाटील परत आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंशी निष्ठा राखली होती. आताच्या या चालू घडामोडींनंतरही कैलास पाटील यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. आ. प्रवीण स्वामी: उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनीही आपली भूमिका जाहीर करताना, आपण कोणत्याही सत्तेच्या मोहाला बळी न पडता उद्धवसेनेसोबतच कायम राहणार असल्याचे ठासून सांगितले आहे. ओमराजेंना होते ३ लाख २९ हजारांचे मताधिक्य शिवसेना फुटीनंतर ओमराजेंनी नेहमीच ठाकरेंसोबत राहण्याचा दावा केला होता. लोकसभा निवडणुकीत ‘मशाल’ चिन्हावर लढताना त्यांनी तब्बल ३ लाख २९ हजार मताधिक्य मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये त्यांची एक वेगळीच क्रेझ होती. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून ते अचानक राजकीय घडामोडींपासून अलिप्त झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पराभवामुळे ते काहीसे व्यथित झाले होते, असेही सांगितले जाते. वाकचौरेंचे पाचवे पक्षांतर उद्धवसेनेच्या सहा खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शिर्डीचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव अग्रस्थानी आहे. वाकचौरे यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीतील हा तब्बल पाचवा पक्षबदल ठरणार आहे. निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेचा (उद्धवसेना) वापर करायचा आणि विजय मिळवताच सत्तेच्या बाजूने सोयीस्कर भूमिका घ्यायची, असा आक्षेप आता त्यांच्यावर घेतला जात आहे. शासकीय सेवेकडून राजकीय शिखरापर्यंतचा प्रवास भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास सुरू होण्यापूर्वी ते शासकीय सेवेत कार्यरत होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी (BDO) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy. CEO) अशा विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी शिर्डी संस्थानमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणूनही काम पाहिले. पहिले पाऊल आणि पहिली खासदारकी २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. शासकीय सेवेतून बाहेर पडत वाकचौरे यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दिग्गज नेते रामदास आठवले यांचा पराभव करत थेट संसद गाठली. केवळ सत्तेच्या समीकरणांसाठी वाकचौरे यांनी आजवर अनेकदा राजकीय भूमिका बदलल्या आहेत: विखे पाटील यांचा पडद्यामागील प्रभाव? भाऊसाहेब वाकचौरे यांच्या राजकीय प्रवासावर अहिल्यानगरमधील वजनदार विखे पाटील घराण्याचा मोठा प्रभाव राहिला आहे. २००९ मध्ये शिवसेनेकडून खासदार झाल्यानंतर, २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावर वाकचौरे यांनी जो काँग्रेस प्रवेश केला होता, त्यामागे राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्य भूमिका होती, कारण तेव्हा विखे पाटील हे काँग्रेसमध्ये आणि सत्तेत होते. आताच्या घडीला राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून महायुती सरकारमध्ये बलाढ्य मंत्री आहेत. त्यामुळेच, विखे पाटलांच्या प्रभावातून वाकचौरे पुन्हा एकदा उद्धवसेनेचा त्याग करून महायुतीमध्ये (शिंदेसेनेत) जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. इतिहास पाहिला तर वाकचौरे यांना शिवसेनेच्या चिन्हाशिवाय कधीही विजय मिळवता आलेला नाही. परंतु, आता २०२४ चा विजय पदरात पडताच ते पुन्हा एकदा ‘सोयीचे राजकारण’ करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Source link
शिवसेना फुटीची INSIDE STORY:संजय जाधवांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी?, वाकचौरेंचे 5 वे पक्षांतर; आष्टीकरांनी कित्ता गिरवला, तर ओमराजेंचा तिसऱ्या सादेला प्रतिसाद!