![]()
शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज (30 जून) मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थेवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे अद्याप न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळ, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मग्रुरी आणि राजकीय घडामोडींवरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. शेतकऱ्यांचे पैसे व्याजासहित परत करा! बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा केली होती. पण आजही धानाची, हरभऱ्याची खरेदी रखडली आहे. अनेक ठिकाणी ज्यांच्या घरी ज्वारी नाही, त्यांनीही ज्वारी व्यापाऱ्याला विकल्याचे दाखवून भ्रष्टाचार केला जात आहे. या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.” ते पुढे म्हणाले, “कापसाचे, धानाचे, ज्वारीचे आणि हरभऱ्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. सरकारने हे पैसे शेतकऱ्यांना व्याजासहित परत केले पाहिजेत.” तसेच 5 जुलैला पीक कर्जमाफीचा जो सुधारित शासन निर्णय निघेल, त्यात सर्व दुरुस्त्या होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिकारी मग्रूर झालेत, 90% भ्रष्टाचारात मग्न काल विधानसभेत अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी प्रशासकीय व्यवस्थेवर कडाडून टीका केली. “अधिकाऱ्यांचा हा संसर्गजन्य रोग फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशात आहे. काही 10% बिचारे प्रामाणिक अधिकारी सोडले, तर 80 ते 90% अधिकारी फक्त ‘कमाई’ करण्यात मग्न आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. “सभागृहातून नेहमी मंत्रालय चालले पाहिजे, मंत्रालयातून सभागृह चालता कामा नये. सभागृहात बोलल्यानंतर त्याचे परिणाम गावपातळीपर्यंत पोहोचले पाहिजेत, तरच बोलण्याला महत्त्व प्राप्त होईल. जनतेचे समाधान झाले पाहिजे, पण तसे होत नाही, हे दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले. ऑनलाइन परीक्षा नको, ऑफलाईनच घ्या! ऑनलाइन परीक्षांमधील गोंधळावर आणि पेपरफुटीवर बच्चू कडू यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या आणि टॅक्सी चालकांच्या मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, पैशातून नाही. ऑनलाईन परीक्षांमध्ये हॅकिंग आणि पेपरफुटीची दाट शक्यता असते. खासगी कंपन्या परीक्षा केंद्रे घेतात, तिथेच सगळा घोळ होतो. जर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होऊ शकतात, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (MPSC) परीक्षा ऑफलाइनच घेतल्या पाहिजेत,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. संगणक परिचालक भरतीत खासगी कंपनीला 250 कोटी का? ग्रामीण भागातील संगणक परिचालकांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी एका मोठ्या घोटाळ्याकडे लक्ष वेधले. “संगणक परिचालकांना मानधन देण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेली कंपनी काहीही न करता वर्षाला २५० कोटी रुपये कमवत आहे. या कंपनीला पैसे देण्यापेक्षा ते थेट संगणक परिचालकांना द्या. विनाकारण हजार ते दोन हजार कोटी रुपये वाया जात आहेत, ते थांबले पाहिजे,” अशी मागणी कडू यांनी केली. पाणी पाणी से मिलने वाला है! शिवसेनेच्या (ठाकरे गट) 14 आमदारांच्या संपर्काबद्दल विचारले असता त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. “शिवसेना शिवसेनेच्याच संपर्कात राहणार ना, यात वेगळे काय? ‘पाणी पाणी से मिलने वाला है’. जोपर्यंत सर्वांचे एकत्रीकरण होत नाही, तोपर्यंत रंग आणि चव वेगळी वाटेल. एकदा एकत्र आले की सगळे होऊन जाईल.” तसेच विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत असल्याबद्दल विचारले असता, “त्या वरिष्ठ आहेत, त्यांचा विचार झाला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Source link
शेतकऱ्यांचे कापूस, धान आणि हरभऱ्याचे पैसे व्याजासहित परत करा!:बच्चू कडू आक्रमक, राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल