Headlines

संजय राऊत हे उबाठा गटाला पोखरून काढणारी वाळवी!:खासदार ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल; संजय दिना पाटलांच्या विधानाबद्दल मागितली माफी




शिवसेनेच्या नवनियुक्त राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडत शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते राहिलेले नसून ते उबाठा गटाला आतून पोखरून काढणारी वाळवी आणि बुडवणारे ‘शकुनी मामा’ झाले आहेत,” असा घणाघात त्यांनी केला. याच पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला खासदार ज्योती वाघमारे यांनी शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी नुकत्याच पत्रकारांसमोर केलेल्या शिवीगाळीच्या प्रकाराबद्दल पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. संजय दिना पाटलांच्या प्रकारावर दिलगिरी “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि माझ्या स्वतःच्या करिअरची सुरुवातही पत्रकारितेतूनच झाली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या वेदना मी समजू शकते. एक-दोन दिवसांपूर्वी आमच्या पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून पत्रकारांच्या संदर्भात जो प्रकार घडला, त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने सर्वांची दिलगिरी व्यक्त करते.” संजय राऊतांच्या भाषेवर हल्लाबोल राऊतांच्या वादग्रस्त विधानांचा खरपूस समाचार घेत वाघमारे म्हणाल्या, “राऊतांच्या जिभेला कुलूप नाही, हे आपण अनेकदा बघितले आहे. त्यांना कुणीही समज देत नाही. महिलांबद्दल अत्यंत बीभत्स भाषेत बोलून पुन्हा ‘हे कट करू नका’ असा माजोरडेपणा दाखवणारे राऊत माता-भगिनींची माफी कधी मागणार आहेत? मी स्वतः राष्ट्रीय महिला आयोगाकडे या भाषेविरुद्ध दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली आहे.” “महाराष्ट्रात संतांची आणि महान साहित्यिकांची भाषा वापरली जाते, शिव्यांची नाही. संजय राऊतांची जीभ ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे, जी उबाठा गटाला आतून पोखरून काढत आहे. यांच्या अश्लील भाषेला वैतागूनच लोकप्रतिनिधी यांना सोडून जात आहेत.” ऑपरेशन ‘उबाठा बुडवा’ आणि ‘काँग्रेस वाढवा’ “राऊत आता काँग्रेसचे आणि राहुल-सोनिया गांधींचे प्रवक्ते झाल्यासारखे वागत आहेत. ते म्हणतायत ‘ऑपरेशन तुडवा’, पण खरंतर त्यांनी ‘ऑपरेशन उबाठा बुडवा आणि काँग्रेस वाढवा’ ही सुपारी घेतली आहे.” उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ उद्धव ठाकरे यांच्या सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र दौऱ्यावरही त्यांनी निशाणा साधला. “मातोश्री ते मंत्रालय हे काही किलोमीटरचे अंतर मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत ज्या माणसाला पार करता आले नाही, ते आता खासदार सोडून गेल्यानंतर महाराष्ट्र फिरतायत. हा दौरा म्हणजे वरातीच्या मागून घोडे धाडण्याचा प्रकार आहे. हे केवळ राजकीय ढोंग असून स्वतःच्या मुलाचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे का, असा प्रश्न पडतो.” ‘लाडकी बहीण’ म्हणून शिंदेंनाच मुख्यमंत्री पाहायचे आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या विमान प्रवासावर बोलताना त्या म्हणाल्या, “राजकीय संस्कृती म्हणून एका विमानातून प्रवास करणे किंवा संवाद साधणे यात काही वावगे नाही.” तसेच मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी एक ‘लाडकी बहीण’ आहे आणि माझ्या लाडक्या भावाने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनीच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, असे वाटण्यामध्ये काहीच गैर नाही.” आदित्य ठाकरे विरुद्ध डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाची तुलना केली. “आदित्य ठाकरे केवळ युरोप-इंग्लंडमध्ये फिरतात, त्यांना महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान सहन होत नाही. त्यांना कोल्ड कॉफी लागते. पण आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब 47-48 अंश तापमानातही विदर्भ-मराठवाड्यात कार्यकर्त्यांसोबत वडापाव आणि कटिंग चहा पिऊन पक्ष वाढवत आहेत. एका घरकोंबड्याची तुलना आकाशात झेप घेणाऱ्या गरुडाशी कशी होऊ शकते?” शेवटी, बळीराजा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, जागतिक महायुद्धाचे सावट आणि अल-निनोच्या संकटामुळे काही अडचणी आहेत, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शेतकरीपुत्र असल्याने ते शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शेतकऱ्यांना सुलभ कर्जमुक्ती मिळावी यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *