![]()
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. रोहित पवार म्हणाले, लासलगावला आमचे जे आंदोलन झाले त्यात कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्या ज्यात आम्हाला कमीतकमी 24 रुपये प्रती किलो हा कांद्याला दर द्यावा. जो त्यांनी स्वतः 2023 ला जाहीर केला होता, अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ज्या लोकांनी आत्तापर्यंत कांदा दिलेला आहे त्यांना 15-16 रुपये अनुदान देता येईल का आणि आपले जे नाफेड आहे, कांदा घेत असताना 8 ते 10 लाख टन त्यांनी कांदा घ्यावा. कांदा घेत असताना मार्केट कमिटीमध्ये घ्यावा आणि त्यामुळे स्पर्धा होऊन रेट वाढतील अशी अपेक्षा आहे. तसेच घेतलेला कांदा हा भारताच्या बाहेर काढावा अशी विनंती देखील मी केली असल्याचे पवारांनी सांगितले आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की साडे 12 रुपये जरी रेट असला तरी तो कदाचित आम्ही 16 करणार आहोत. पण तरी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केली की 24 रुपये किंवा 20 रुपयांच्या खाली हा रेट शेतकऱ्यांना परवडत नाही. नीट परीक्षेबाबत काय म्हणाले रोहित पवार? देशात नीट परीक्षेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे, यावर देखील रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, नीट परीक्षेच्या संदर्भात सीबीआय कडून कारवाई केली जात असून ती योग्य पद्धतीने केली जात आहे. पण तरी सुद्धा अजून कडक करून त्यात जे जे कोणी जबाबदार असतील त्यांना तुम्ही पकडावे आणि परत एकदा नीट असो किंवा राज्यातल्या ज्या परीक्षा असतात त्या कोणत्याही परीक्षा अडचणीत येऊ नये यासाठी दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी पवारांनी केली आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करावी दरम्यान, काही दिवसांपूर्वी गव्हर्नर साहेबांना भेटून आम्ही विनंती केली होती महापुरुषांचा अपमान महाराष्ट्रातील काही लोकांकडून करण्यात आला होता किंवा चुकून अपमान झाला होता. हे होत असेल तर एक कायदा येणाऱ्या सेशनमध्ये आणण्यात यावा जेणेकरून उद्या कोणीही महापुरुषांबद्दल चुकून किंवा मुद्दाम बोलत असेल तर कारवाई करता यावी, तसे पत्र राज्यपाल महोदयांनी आपल्या शासनाला पाठवले आहे. त्यामुळे पुढील सेशनमध्ये हा मुद्दा घ्यावा अशी विनंती मी केली आहे. पुढील अधिवेशनात शक्ती कायदा लागू व्हावा तसेच या अधिवेशनात शक्ती कायदा हा लागू व्हावा आणि महिलांच्या-मुलींच्या सुरक्षेसाठीचे बिल जे अनिल देशमुख साहेबांनी महाविकास आघाडीच्या काळात मांडले होते आणि पास झाले होते. पण केंद्राकडून ते परत आले आहे. त्यामुळे हा मुद्दा परत एकदा सेशनमध्ये घ्यावा, अशी एक विनंती केल्याचे रोहित पवारांनी सांगितले. रोहित पवारांनी ट्विट करत काय म्हटले? रोहित पवार ट्विट करत म्हणाले, राज्यात गेल्या काही काळापासून महापुरुषांबाबत बेजबाबदार वक्तव्य करून त्यांचा अवमान करण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा लोकांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने हे लोक निर्ढावले आहेत. ही गोष्ट राज्याच्या प्रतिमेला शोभणारी नाही. तसेच राज्यातील अंधश्रद्धा, जादूटोणा, अघोरी प्रथा, भोंदूगिरीच्या वाढत्या घटनाही चिंताजनक आहेत. यातून अनेकांची फसवणूक होत असून काहींचं तर आयुष्य यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे महापुरुषांबाबत बेजबाबदार आणि चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करण्याची आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्पष्ट नियमावली करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून केली. तसेच याबाबतचं निवेदनही त्यांना दिलं. या विषयावर यापूर्वी महामहीम राज्यपाल महोदयांना भेटून त्यांनाही निवेदन दिलं असून, त्यांनीही यासंदर्भात कायदा करण्याबाबतचं पत्र शासनाला लिहिलं आहे.
Source link
आमदार रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:कांद्याचे दर, नीट परीक्षेसह महिलांच्या सुरक्षेबाबतही केली चर्चा; काय म्हणाले पवार?