Headlines

पुणे विभागात मान्सूनपूर्व तयारी; यंत्रणा सज्ज:प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी घेतला आढावा




पुणे विभागात आगामी मान्सून आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले आहेत. विधानभवन येथे आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मान्सून काळात अतिवृष्टीमुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश द्विवेदी यांनी दिले. नालेसफाईची उर्वरित कामे युद्धपातळीवर संपवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील दरडप्रवण क्षेत्रांमध्ये संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ‘डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन’ तयार ठेवण्यास सांगण्यात आले. नदीकाठच्या आणि नाल्यांच्या कडेला राहणाऱ्या कुटुंबांसाठी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये आवश्यक सुविधांची सोय निश्चित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने औषधे आणि लसींचा पुरेसा साठा ठेवावा, असे निर्देश देण्यात आले. ग्रामीण व शहरी भागात पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून क्लोरिनेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या, जेणेकरून दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवता येईल. हवामान विभागाने यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाच्या वितरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचे नियोजन करण्याच्या सूचनाही द्विवेदी यांनी दिल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) तुकड्या तैनात असून स्थानिक पातळीवर ‘आपत्ती मित्रांना’ प्रशिक्षित करण्यात आले आहे. ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना जीवरक्षक जॅकेट, बोटी, बॅटरी आणि दोरखंड यांसारखे अत्यावश्यक साहित्य पुरवण्यात आले असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पुराचा प्रश्न गंभीर असतो. यावर उपाय म्हणून जलसंपदा विभागाने कर्नाटक सरकारशी आलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत समन्वय साधला आहे. पूर नियंत्रणासाठी दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये नियमित संवाद सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच महावितरण आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *