Headlines

नागपूर पोलिसांनी दरवाजा तोडून वाचवले महिलेचे प्राण:रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेसाठी तयार केला 'ग्रीन कॉरिडोअर




नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या बेलतरोडी पोलिसांनी तत्पर आणि धाडसी कारवाई करत एका महिलेचा जीव वाचवला. त्यांच्या वेगवान हालचालींमुळे एका कुटुंबात घडणारी संभाव्य हत्या टळली. 21 मे 2026 रोजी रात्री 12:05 वाजता बेलतरोडी पोलिसांचे नाईट पॅट्रोलिंग सुरू असताना, गोटाळपांजरी परिसरात आरोपीच्या वडिलांनी पोलिस वाहन थांबवले. त्यांच्या मुलाने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या निर्देशानुसार, पोलिस उपनिरीक्षक नारायण घोडके आणि पोलिस अंमलदार रितेश गोतमारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अंमलदार रितेश गोतमारे यांनी तात्काळ दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आतमध्ये आरोपी ऋषिकेश सुरेंद्र वानखडे (वय 22) त्याची पत्नी आश्लेषा वानखडे (वय 25) हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत होता. पोलिसांनी त्वरित त्याच्या हातातील चाकू हिसकावून त्याला ताब्यात घेतले. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ वैद्यकीय उपचारांची गरज होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका स्वतंत्र पोलिस पथकाने जखमी महिलेला घेऊन एम्स हॉस्पिटलकडे धाव घेतली. पोलिसांनी रात्रीच्या वेळी 9.3 किलोमीटरचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत पार केले. डॉक्टरांशी आधीच समन्वय साधल्यामुळे वेळेत उपचार सुरू झाले आणि महिलेचे प्राण वाचले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे. बेलतरोडी पोलिस ठाणे हद्दीत 2025 आणि 2026 मध्ये प्रभावी नाईट पॅट्रोलिंगमुळे हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलिस आयुक्तांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *