![]()
नीट पेपरफुटीमुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) ही शक्यता फेटाळून लावली आहे. प्रस्तुत प्रवेश प्रक्रियेत सीईटी गुणांसह नीट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू केली जाईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी या प्रवेश प्रक्रियेविषयी कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहही सीईटी सेलने या प्रकरणी केले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच नीट पेपरफुटीमुळे अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडणार असल्याचे विधान केले होते. हे अभ्यासक्रम वगळून प्रवेश प्रक्रिया राबवता येणार नाही का? असा प्रश्न यावेळी केला असता सीईटी कक्षाच्या आयुक्तांसह मंत्री पाटील यांनीही अशी प्रक्रिया राबवणे हे या 9 अभ्यासक्रमांसाठी इच्छुक असणाऱ्या मुलांसाठी अन्यायकारक ठरेल, त्यांना इतर शाखांना प्रवेश घ्यायचे असतील तर ते घेता येणार नाहीत, असे नमूद केले होते. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. पण आता सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नीटचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागा वागळून ही प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याची स्पष्टोक्ती दिल्यामुळे या सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. काय म्हणणे आहे सीईटी सेलचे मत? सीईटी सेलच्या मते, नीट परीक्षेचे गुण कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, लेदर तंत्रज्ञान, पॅकेजिंग तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, मुद्रण अभियांत्रिकी, फॅशन तंत्रज्ञान, टेक्स्टाइल रसायनशास्त्र या 9 अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 15 टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांसाठी ग्राह्य धरण्यात येतात. पण हे अभ्यासक्रम राज्यातील केवळ 17 शासनमान्य संस्थांमध्येच आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून जाहीर होणाऱ्या वेळापत्रकानुसारच प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जाईल. प्रवेश प्रक्रियेविषयी संभ्रम बाळगू नका नीट फेरपरीक्षा 2026 चा निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्यास संबंधित 9 अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिल्या जाणाऱ्या 15 टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांचा समावेश न करता, त्या जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करण्यात येईल. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेविषयी कोणताही संभ्रम बाळगू नये, असेही सीईटी सेलने या प्रकरणी स्पष्ट् केले आहे.
Source link
'नीट' लीकचा अभियांत्रिकी प्रवेशाला फटका नाही:नीटचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या 15% जागा वगळून प्रवेश प्रक्रिया राबवणार – सीईटी सेल