![]()
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तान आणि दुबईतून भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या शाजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि आयएसआयच्या हस्तकाच्या संशयास्पद जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. राज्यभरातील तब्बल १७५ संशयित तरुण भट्टीच्या संपर्कात आल्याचे उघड झाल्यानंतर, एटीएसने आज सकाळी ७ वाजल्यापासून एकाच वेळी धडक शोध मोहीम सुरू केली. या कारवाईमुळे देशविरोधी शक्तींचे मोठे डिजिटल जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या देशव्यापी कारवाईत एकट्या पूर्व विदर्भातून १० संशयित तरुण एटीएसच्या रडारवर आले आहेत. यामध्ये नागपूर शहरातून ४, चंद्रपूरमधून ३, तर गोंदिया, गडचिरोली आणि वर्ध्यातून प्रत्येकी १ संशयित तरुणाचा समावेश आहे. एटीएसच्या विशेष तुकड्यांनी या सर्व ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून संबंधित तरुणांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. पूर्व विदर्भात शाजाद भट्टीशी संबंधित कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच एटीएसने चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात अशाच प्रकारची गुप्त कारवाई केली होती. तेव्हापासूनच संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवली जात होती. शाजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानी गँगस्टर असून, तो सध्या दुबईतून आयएसआयच्या इशाऱ्यावर ‘फुट सोल्जर’ मिशन चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. भारतातील तरुण पिढीला लक्ष्य करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भडकावणे, देशात स्लीपर सेल्स तयार करणे आणि मोठ्या शहरांमध्ये घातपात घडवून आणणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच दिल्ली आणि पंजाबमध्ये भट्टीच्या ६ हस्तकांना अटक करून पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा मोठा कट उधळला होता. या आरोपींच्या चौकशीतूनच त्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. या ताज्या कारवाईत एटीएस प्रामुख्याने एका वेगळ्या अंगाने तपास करत आहे. हे संशयित तरुण शाजाद भट्टीच्या थेट संपर्कात कसे आले, त्यांनी भट्टीने तयार केलेल्या चिथावणीखोर रील्स सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या का किंवा त्याला फक्त ‘लाईक’ केले होते का, याचा तांत्रिक तपास केला जात आहे.
Source link
एटीएसची मोठी कारवाई, 175 संशयितांची चौकशी:पाकिस्तान-दुबई कनेक्शन; पूर्व विदर्भातील 10 जणांचा समावेश