मुंबई आणि परिसरातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्याच्या अभियानाला राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर राबवले असून आतापर्यंत सुमारे 1 लाख 65 हजार 800 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्र
.
मराठी भाषा शिकण्यासाठी इच्छुक असलेल्या चालकांसाठी यापुढेही प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध राहणार असून, त्यासाठी मुंबईसह ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबईतील विविध केंद्रांची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना पुरेसा वेळ दिला जाईल; मात्र त्यानंतरही जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांवर परवान्याबाबत कारवाई केली जाऊ शकते, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
105 दिवसांच्या अभियानात 1.65 लाख चालकांना प्रशिक्षण
रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा, या उद्देशाने राज्यात 1 मे ते 15 ऑगस्टदरम्यान विशेष अभियान राबवण्यात आले. या अभियानासाठी काही संघटनांनी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र, सरकारने 105 दिवसांचा कालावधी दिला. या काळात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सुमारे 180 ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. जवळपास 1,800 साहित्यिकांनी विविध ठिकाणी जाऊन रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आणि मराठी संवादाचे प्रशिक्षण दिले. ठराविक प्रश्नांच्या माध्यमातून चालकांशी संवाद साधून त्यांना दैनंदिन व्यवहारात वापरता येईल, अशा पद्धतीने मराठी शिकवण्यात आली. या अभियानातून तब्बल 1 लाख 65 हजार 800 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे प्रशिक्षण मिळाल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मराठी प्रवाशांनीही मराठीत संवाद साधावा
या प्रशिक्षणाला चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरनाईक यांनी केला. काही अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी प्रवाशांनी त्यांच्याशी मराठीत संवाद साधल्यास ते केवळ कामाच्या ठिकाणीच नव्हे, तर आपल्या कुटुंबीयांशीही मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतील, अशी भूमिका व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती यांचा आदर करत मराठी भाषेचा स्वीकार करण्याचे आवाहनही सरनाईक यांनी केले.
अजूनही मराठी शिकण्याची संधी
105 दिवसांचे अभियान संपले असले तरी मराठी शिकण्याची इच्छा असलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रशिक्षणाची दारे बंद झालेली नाहीत. कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून इच्छुक चालकांना यापुढेही प्रशिक्षण देण्याची तयारी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित केंद्रांची माहिती देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबईसह अन्य भागांमध्ये प्रशिक्षणाची केंद्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. चालकांना प्रशिक्षण केंद्रांची माहिती सहज मिळावी यासाठी आरटीओच्या माध्यमातून एक संपर्क क्रमांकही लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी न शिकणाऱ्यांवर काय कारवाई?
मराठी शिकण्यासाठी चालकांना पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रथम संबंधित चालकाला नोटीस देऊन मराठी शिकण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर त्याची मौखिक चाचणी घेतली जाईल. एक महिन्यानंतरही मराठीचे आवश्यक ज्ञान प्राप्त झाले नसल्यास पुढील तीन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. या कालावधीतही चालकाने मराठी शिकले नाही, तर त्याचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार नाही.
एक महिना आणि त्यानंतर तीन महिने असा एकूण चार महिन्यांचा कालावधी देऊनही संबंधित चालकाने जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार दिल्यास परवाना पूर्णपणे रद्द करण्याची तरतूद असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. 12 ऑगस्ट 2026 रोजीच्या कायद्यानुसार ही प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुणाचाही रोजगार हिरावून घेणार नाही
मराठीच्या मुद्द्यावरून मुंबई आणि ठाण्यातील वातावरण खराब करण्याचा काही जणांकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठ्या प्रमाणात दंड करण्यात आला, त्यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवले जात आहे किंवा ते आपल्या गावाकडे परत जात असल्याचे दाखवणारे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत सरनाईक म्हणाले की, महायुती सरकार कोणाचाही रोजगार हिरावून घेणारे सरकार नाही. सरकार रोजगार देण्याच्या भूमिकेत आहे.
हिंदी आणि मराठी भाषिकांमध्ये संघर्ष निर्माण होईल, अशा पद्धतीने काही व्हिडीओ जाणीवपूर्वक प्रसारित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मराठी भाषा शिकावी आणि महाराष्ट्राच्या भाषिक-सांस्कृतिक अस्मितेचा आदर करावा, असे त्यांनी म्हटले.
कुणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही
रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी सरकार चर्चा करत असून, त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचा विचार केला जात असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. अबू आझमी यांच्यासह विविध रिक्षा-टॅक्सी युनियनच्या नेत्यांनी या विषयावर संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. संजय निरुपम आणि हाजी अराफात शेख यांच्यासह इतर संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा झाल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. कायद्याच्या चौकटीबाहेर कोणी काम करत असेल तर परिवहन विभागाकडून कारवाई केली जाईल; मात्र कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश सुर्वेंच्या माध्यमातून 20 ते 22 हजार चालकांना प्रशिक्षण
या अभियानात कांदिवलीचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही मोठी भूमिका बजावल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून सुमारे 20 ते 22 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे देण्यात आले. तसेच मालाड, बोरिवली, कांदिवली आणि दहिसर परिसरातील सुमारे २० हजार रिक्षा चालकांनी या अभियानात सहभाग घेतला. या चालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी स्वतंत्र बैठक
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामगार कायद्यानुसार अधिकाधिक फायदे मिळावेत, यासाठीही सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा होणार आहे. यासाठी ३ सप्टेंबरला विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी शिका, पण अफवांवर विश्वास ठेवू नका
मराठी भाषा शिकवण्याच्या अभियानामागे रोजगार हिरावून घेण्याचा कोणताही हेतू नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी पुन्हा स्पष्ट केले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकावी, प्रवाशांशी सुसंवाद साधावा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर करावा, हीच सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मराठी भाषा शिकण्यासाठी इच्छुक असलेल्या चालकांना यापुढेही प्रशिक्षण देण्याची तयारी साहित्यिक संघटनांनी दर्शवली आहे. त्यामुळे मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना थेट कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यावर सरकारचा भर असल्याचे सरनाईक यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा
देवेंद्र फडणवीसांची दिल्लीला जाण्याची आवराआवर: कुंभमेळ्याच्या निधीत 27 कोटींचा भ्रष्टाचार? संजय राऊतांचा मोदी सरकारसह सरन्यायाधीशांवर निशाणा

नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकार, भाजप आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीला रवाना होणार असून, त्याआधी ते राज्यातील प्रलंबित कामे उरकून आपली माणसे महत्त्वाच्या पदांवर बसवण्याची आवराआवर करत असल्याचा मोठा दावा राऊत यांनी केला आहे. यासोबतच नाशिकच्या कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार, विमानतळांचे खासगीकरण आणि आदिवासींच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी