![]()
‘मिशन आयएएस’ संस्था उद्याची आदर्श पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करत आहे, असे प्रतिपादन महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. ज्या विद्यार्थ्यांना समाजाची सेवा करायची आहे आणि लोककल्याणकारी योजना राबवायच्या आहेत, त्यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होऊन देशाची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्रिवेणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित सात दिवसीय संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी, अधिकारी आणि उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गेल्या पंचवीस वर्षांपासून ‘मिशन आयएएस’चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, त्यांच्या पत्नी विद्याताई काठोळे आणि कन्या प्रा. पल्लवी येरूळकर हे अत्यंत निष्ठेने हे कार्य अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेऊन विकास खारगे यांनी कौतुक केले आणि स्वतःच्या हस्ते काठोळे कुटुंबीयांचा सत्कार केला. महाराष्ट्राला आज खऱ्या अर्थाने काठोळे यांच्यासारख्या शैक्षणिक कार्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी विकास खारगे यांचे वडील शंकरराव खारगे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचाही शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, प्राचार्य देवेंद्र खडसे, शारदाताई इटणकर, उद्योजक चंद्रशेखर मुरादे, उपायुक्त मेहबूब कासार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन माळकर यांनी केले, संचालन प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले, तर आभार चंद्रशेखर मुरादे यांनी मानले. या समारंभात प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे लिखित ‘दीपस्तंभ’ या पुस्तकाचे विमोचनही करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सहभागी विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या मनोगतातून असे संस्कार शिबीर यापूर्वी कधीही अनुभवले नसल्याचे सांगितले.
Source link
'मिशन आयएएस' आदर्श पिढी घडवत आहे – विकास खारगे:अमरावतीच्या संस्कार शिबिराच्या समारोपात कौतुक