Headlines

चांदूर रेल्वे-कुऱ्हा पर्यायी रस्ता अरुंद; वाहनधारकांची डोकेदुखी:एका बाजूने रस्ता खाेदला, धुळीने नागरिक त्रस्त, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष




चांदूर रेल्वे ते कुऱ्हा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना पर्यायी रस्ता देण्यात आला आहे. मात्र तो फार अरुंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एका बाजूने रस्ता खोदून काम सुरू ठेवण्यात आले असून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. दरम्यान पर्यायी मार्ग अत्यंत अरुंद असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. परिणामी या रस्त्यावरून अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. चांदूर रेल्वे ते कुऱ्हा मार्गावर काही ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरूनही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूचे खोदकाम सुरू असल्याने वाहने पुढे नेताना अडचणी निर्माण होत आहे. पर्यायी मार्गाने किमान दोन मोठी वाहने सहज जाऊ शकतील एवढी जागा अपेक्षित असताना प्रत्यक्षात दोन बसेस किंवा दोन ट्रक समोरासमोर आल्यास वाहने अडकून पडत आहेत. अशाप्रकारे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून प्रवाशांचा वेळ व इंधन दोन्ही वाया जात आहे. २१ मे च्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आमला जवळ मोठा वाहतूक खोळंबा निर्माण झाला होता. कुऱ्हा येथून चांदूर रेल्वेकडे येणारी बस आणि तिच्यामागे असलेली पोलीस व्हॅन समोरून येणाऱ्या ट्रकसमोर अडकून पडली. अरुंद मार्गामुळे कोणतेही वाहन पुढे जाऊ शकत नव्हते. अखेर जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प राहिली. प्रथम पोलीस व्हॅनला मार्ग काढून देण्यात आला. त्यानंतर बसमधील सुमारे १५ ते २० प्रवासी खाली उतरले आणि बस काही अंतर मागे घेतल्यानंतर बस व ट्रक एकमेकांसमोरून जाऊ शकले. या प्रकारामुळे रस्त्याच्या कामातील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. दररोज अशाच प्रकारच्या अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून दुचाकीस्वार, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून वाहनचालकांना समोरचेही नीट दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून पर्यायी मार्ग रुंद करण्याचे निर्देश कंत्राटदाराला द्यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून पुढे आली आहे. तसेच नियमित पाणी मारून धूळ नियंत्रणात ठेवावी, कामाचा दर्जा उत्तम राखावा आणि कामाचा वेग वाढवून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा, अशीही मागणी होत आहे. दररोज जीव मुठीत घेऊन करतो प्रवास ^मी दररोज कुऱ्हा ते चांदूर रेल्वे प्रवास करतो. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजूची पर्यायी जागा खूपच कमी असल्यामुळे वाहन सुरळीत एकमेकांसमोरून जाण्यासाठी बराच वेळ थांबावे लागते. धूळही मोठ्या प्रमाणात उडत असल्याने प्रवास त्रासदायक झाला आहे. प्रशासनाने मोठा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, नियमित पाणी मारावे तसेच कामाचा दर्जा चांगला ठेवून वेगाने काम पूर्ण करावे. राम इखार, प्रवासी, कुऱ्हा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *