![]()
तालुक्यातील जावरा फाटा ते वरुडा या ग्रामीण मार्ग क्र. तीनची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज वानखडे यांना निवेदन दिले . दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला . या मार्गावरून दररोज ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, ग्रामस्थांची वर्दळ असते. मात्र, सध्या या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिवहन विभागाने या मार्गावरील एस.टी. बससेवा बंद केली. परिणामी, ग्रामस्थांचे हाल होत असून दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.यापूर्वी १० ऑगस्ट २०२५ रोजीदेखील काँग्रेसतर्फे या संदर्भात निवेदन दिले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळ्यानंतर काम सुरू करू असे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक महिने उलटूनही कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. तालुका काँग्रेस कमिटीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या मार्गाची डागडुजी करून मंजूर झालेले काम सुरू करण्याची मागणी केली. १० दिवसांत प्रशासनाने पावले उचलली नाहीत, तर जिल्हा परिषद बांधकाम विभागावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष वैभव वानखडे, विश्वजीत बाखडे, सोपान डोळस, संकेत धोटे, अनिकेत तालन, दीपक पडळकर, गौरव चौधरी, आकाश मकेश्वर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
जावरा ते वरुडा मार्गाची दुरवस्था; काँग्रेस आक्रमक:10 दिवसांत बांधकाम सुरू न झाल्यास आंदोलन