रायगडच्या आंबेनळी घाटात झालेल्या कार अपघातात एक नवी माहिती समोर आली आहे. सदर कारचा अपघात शनिवारी रात्रीच झाला होता. पण 24 तासांपर्यंत त्याचा कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता. रविवारी सकाळी मृत तरुणांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर रात्री 11
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पोलादपूर महाबळेश्वर घाटात एक स्कॉर्पिओ कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आजगाव येथील हे 8 तरुण दापोली येथे पर्यटनाचा आनंद लुटून आपल्या गावी परतत असताना हा अपघात झाला. आंबेनळी घाटात दाभिळ गावच्या हद्दीत कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. पण आता हा भयंकर अपघात रविवारी रात्री नव्हे तर शनिवारी रात्रीच झाल्याची नवी माहिती समोर आली आहे.
मुले हर्णेवरून शनिवारी रात्रीच निघाले होते
या दुर्घटनेत ठार झालेल्या रितेश लोखंडे याच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझा मुलाने आपण हर्णे येथून रविवारी नव्हे तर शनिवारी रात्री निघाल्याचे सांगितले होते. आम्ही अनेकदा सांगूनही तो त्याच्या मित्रांसोबत पिकनिकला गेला. शुक्रवारी रात्री ते साताऱ्यातून निघाले. शनिवारी पहाटे ते हर्णे येथे पोहोचले. दिवसभर तेथील समुद्र किनारी फिरले. तेथील काही स्टेटसही त्यांनी आपल्या मोबाईवर ठेवले होते. रितेशने आपल्या आईला फोन करून आपण मासळी खाल्ल्याचे सांगितले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी 7 वा. मला फोन करून आम्ही रात्री 10 वा. निघणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर शनिवारी रात्री 10 वा. ते जेवण आटोपून साताऱ्याच्या दिशेने निघाले. रविवारी सकाळी मी कामावरून घरी परतलो. पण तो घरी आला नव्हता. त्यामुळे मला काळजी वाटत होती. दिवसभर माझे मन लागत नव्हते. त्यामुळे मी सतत त्याला फोन करत होतो. मी त्याला 50-60 फोन केले असतील. त्याच्या फोनची रिंग वाजत होती. पण कुणी फोन उचलत नव्हते. त्यानंतर रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास मी माझ्या मोठ्या भावाला फोन केला. त्यांनी माझ्या भाचीला फोन करून मुले घरी पोहोचली नसल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही त्यांचा शोध सुरू केला.
मी अजिंक्यतारा रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तेथील डॉक्टरांनी मला मदत केली. आम्ही पोलिस स्टेशनला फोन केले. मुलांचे फोन ट्रॅक केले. रात्री 1-2 वाजेपर्यंत आम्ही हे पाहत होतो. तेव्हा आम्हाला कळले की, एक गाडी आंबेनळी घाटात खोल दरीत कोसळली आहे. हे कळल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, असे रितेश लोखंडेच्या वडिलांनी सांगितले. त्यांनी सांगितलेल्या या घटनाक्रमामुळे अपघात रविवारी रात्री नव्हे तर शनिवारी रात्री घडल्याचे स्पष्ट होते. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
वाचा सविस्तर
एसयूव्ही 1,000 फूट खोल दरीत कोसळून 8 जण ठार:रायगडच्या पोलादपूर – महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात मध्यरात्री घडली घटना

रायगड जिल्ह्यात एक एसयूव्ही गाडी खड्ड्यात कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात घडला. मृत झालेले सर्वजण साताऱ्याचे रहिवासी होते आणि दापोलीहून साताऱ्याकडे प्रवास करत होते. वाचा सविस्तर