Headlines

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष?:आमदार इद्रीस नायकवाडी यांना राजीनामा मागितल्याची चर्चा; नायकवाडी यांची भूमिका काय?




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. अजित पवारांनी अत्यंत विश्वासाने राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर संधी दिलेले पक्षाचे अल्पसंख्याक चेहरे आमदार इद्रीस नायकवाडी यांना पक्षाच्या नव्या युवा नेतृत्वाकडून राजीनामा मागण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडींनी इद्रीस नायकवाडी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पक्षाच्या या सूचनेबाबत त्यांना अवगत केल्याचे समजते. मात्र, आमदार नायकवाडी यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही, अशी अत्यंत ठाम भूमिका घेतल्याने पक्षात नवीन वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इद्रीस नायकवाडी यांची १५ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन दिवंगत नेते अजित पवार यांच्यामुळे राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर वर्णी लागली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर नायकवाडी यांनी अजित पवारांना साथ दिली होती आणि पक्षातील अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांना ही संधी देण्यात आली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर आता पक्षातील समीकरणे बदलली असून नव्या नेतृत्वाकडून त्यांना पद सोडण्याचे संकेत दिले जात असल्याची चर्चा आहे. इद्रीस नायकवाडींचा राजीनामा देण्यास ठाम नकार या सर्व चर्चांवर इद्रीस नायकवाडी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इद्रीस नायकवाडी यांना उपमुख्यमंत्र्यांच्या ओएसडींच्या भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले, “उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंत्रालयात सातत्याने भेटत असतात, मात्र मला अद्याप कोणत्याही नेत्याकडून किंवा पक्षाकडून अधिकृतपणे राजीनामा मागण्यात आलेला नाही,” असे त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले. तसेच, “दिवंगत नेते अजित पवार यांनी मला ही संधी दिली होती, त्यांच्याकडून कधीही अशी सूचना आली नव्हती. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष दरम्यान, उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नायकवाडी यांच्या राजीनाम्याचा विषय अजेंड्यावर येण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर आणि अल्पसंख्याक समाजातील एक वजनदार नेते म्हणून नायकवाडींची ओळख आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर दबाव आणल्यास त्याचे पडसाद स्थानिक राजकारणातही उमटू शकतात. अल्पसंख्याक समाजात मोठे वजन इद्रीस नायकवाडी हे सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही दीर्घकाळ काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जेव्हा ऐतिहासिक फूट पडली, तेव्हा नायकवाडी यांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्यासोबत जाण्याचा मोठा निर्णय घेतला होता. अल्पसंख्याक समाजात असलेले त्यांचे सामाजिक योगदान आणि राजकीय वजन विचारात घेऊनच, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यपाल नियुक्त कोट्यातून त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती. आता अजित पवारांच्या पश्चात पक्षातील नवीन फळी त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगल्याने, सांगलीसह राज्यातील अल्पसंख्याक राजकारणात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *