Headlines

मत्स्यविज्ञान महाविद्यालयाने महिलांना दिले व्यावसायिक प्रशिक्षण:गोड्या पाण्यातील माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे धडे




मोर्शी येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालय आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण महिलांसाठी तीन दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना गोड्या पाण्यातील माशांपासून ‘मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि समारोपीय कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मोर्शी तालुक्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचतगटांच्या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्यांना माशांवर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित पदार्थ कसे तयार करावेत, याचे सखोल मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील सोमवंशी या समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्यांच्या हस्ते महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजीव राठोड आणि सहयोगी प्राध्यापक स्वप्नील घाटगे यांच्या उपस्थितीत ‘मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ प्रक्रिया पद्धती मार्गदर्शन पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना सुनील सोमवंशी यांनी प्रशिक्षणार्थी महिलांच्या उत्साहाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. रोहिणी मुगळे यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत, महिलांना स्वतःचा मत्स्यप्रक्रिया व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व यशस्वी महिलांना याप्रसंगी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शुभम सोनी यांनी केले, तर प्रा. डॉ. अमोल राठोड यांनी आभार प्रदर्शन केले. महिलांच्या नवीन व्यावसायिक प्रवासाला शुभेच्छा देऊन या शिबिराची सांगता झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *