![]()
पुणे, प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनेत आज चौथ्या दिवशी शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे. अद्याप एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मोशी येथील कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या घटनेत इमारतीत २२ तर इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. घटनेनंतर पाच नागरिक सुखरूप बाहेर पडले, तर भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. त्याच दिवशी इमारतीत अडकलेल्या नऊ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ९ जुलै रोजी भावेश वाणी या नागरिकास इमारतीतून बाहेर काढण्यात आले, परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्घटनाग्रस्त इमारतीत प्रवेश करण्यासाठी बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इमारत धोकादायक आणि अस्थिर असल्याने सुरक्षित मार्ग तयार करणे कठीण झाले. इमारतीच्या सभोवतालचा मलबा हटवण्यासाठी १२ पोकलेन, डंपर आणि जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. काल रात्री दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक काँक्रिट भाग हटवण्यासाठी दोन अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशिन घटनास्थळी आणण्यात आल्या. एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली या मशिनच्या सहाय्याने इमारतीचा अस्थिर भाग नियंत्रित पद्धतीने हटवण्यात आला. त्यानंतर इमारतीत प्रवेश करून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. आज दिवसभरात ७ मृतदेह सापडले दिवसभर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) आणि राहुल गायकवाड (वय ३५, मोशी) हे इमारतीमध्ये आढळून आले. त्यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले असता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृतदेह बाहेर काढण्याचा घटनाक्रम बचाव पथकाने सलग शोध मोहीम राबवत गुरुवारी (९ जुलै) पहिला मृतदेह बाहेर काढला होता, तर शनिवारी (आज, ११ जुलै) दुपारनंतर एकापाठोपाठ एक असे सलग सहा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. ११ जुलै २०२६ रोजीचे बचावकार्य: एका नागरिकांचा अद्यापही शोध सुरू तथापि, इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली अडकलेल्या एका नागरिकाचा अद्यापही युद्धपातळीवर शोध सुरू आहे. याकरिता एनडीआरएफच्या श्वान पथकाची मदत घेण्यात येत असून विविध यंत्रणांचा वापर करून अविरतपणे ही शोधमोहीम सुरू राहणार आहे.
Source link
मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 7 मृतदेह आढळले, मृतांची संख्या 8 वर, एकाचा शोध अद्याप सुरू; 72 तासांपासून शोधकार्य चालू