Headlines

हिंगोलीत हार्डवेअरच्या दुकानातून चोरट्यांनी 4.22 लाखांचा मुद्देमाल पळविला:हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




हिंगोली शहरातील महेश चौक भागात एक हार्डवेअरच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून आत प्रवेश करून चोरट्यांनी 4.22 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बुधवारी ता. 26 हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील महेश चौक भागात नितीन निलावार यांचे राजेश्‍वरा हार्डवेअर नावाचे दुकान आहे. मंगळवारी ता. 25 रात्री नितीन हे दुकान बंद करून घरी गेले होते. नेहमी प्रमाणे आज सकाळी त्यांनी दुकान उघडले. त्यानंतर एका ग्राहकासाठी पितळी कॉक व इतर वस्तू हव्या असल्याने त्यांनी या वस्तूंची पाहणी केली. मात्र या वस्तू आढळून आल्या नाहीत. त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात दुकानाच्या वरच्या मजल्या वरील खिडकीतून एक चोरटा दुकानात आल्याचे दिसून आले. या चोरट्याने दुकानात आल्यानंतर चेहरा ओळखू येऊ नये यासाठी दुकानातीलच एक मेनकापडाची पन्नी तोंडाला गुंडाळली त्यानंतर दुकानातील नळ फिटींगचे पितळी सॅनिटरी कॉक व इतर सामान पळविल्याचे दिसून आले. यावरून नितीन यांनी साहित्याची तपासणी केली असता दुकानातील तब्बल 650 ते 700 कॉक पळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या कॉकची किंमत 4.22 लाख रुपये आहे. या प्रकरणी नितीन यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने अधिक तपास सुरु केला आहे. पोलिसांनी इतर दुकानावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *