Headlines

जि.प. सीईओ अति जोखमीच्या गरोदर मातांच्या प्रत्यक्ष भेटीला:मेळघाटातील बालमृत्यूंमध्ये घट आणण्यासाठी सूचना‎




मेळघाटातील बालमृत्यूच्या संख्येत घट व्हावी. त्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी तेथील आरोग्य यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. अति जोखमीच्या (हाय रिस्क) गरोदर मातांची प्रत्यक्ष गृह भेट घेतली. आरोग्य तपासणीवरही त्यांनी लक्ष दिले. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावली आहे. अलीकडेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध गावांना प्रत्यक्ष भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी अति जोखमीच्या गरोदर मातांची गृह भेट घेतली. त्यांच्या आरोग्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारीसे हेही प्रामुख्याने उपस्थित होते. या दौऱ्याची सुरुवात वैरागड केंद्रांतर्गतच्या चटवाबोड गावातून झाली. येथे गांधी यांनी पुष्पा गंगाराम चतुर या अति जोखमीच्या गरोदर मातेची भेट घेतली. त्या मातेच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली. गरोदरपणातील धोक्याची लक्षणे समजावून सांगितली. रुग्णालयातील संस्थात्मक प्रसूतीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले. योग्य व पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन केले. नियमित औषधोपचाराबाबत सूचना दिल्या. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्याबाबतही समुपदेशन केले. त्या मातेसह तिच्या कुटुंबीयांचे सविस्तर समुपदेशन केले. दौऱ्याचा दुसरा पडाव रंगूबेली येथे होता. येथे मिशन २८ अंतर्गत पाहणी करण्यात आली. समुपदेशन करण्यात आले. यावेळी कविता प्रकाश उईके यांच्या निवासस्थानी भेट देण्यात आली. अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून या भागातील गर्भवती महिलांना मिळणाऱ्या अमृत आहार योजनेच्या लाभाबाबतही त्यांनी विचारपूस केली. शिवाय मातेला शासनाकडून मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला. सुरक्षित प्रसूतीसाठी संस्थात्मक प्रसूती किती महत्त्वाची आहे, हे पटवून देण्यात आले. या विशेष दौऱ्यादरम्यान स्वतः जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काही गरोदर मातांची वैद्यकीय तपासणी केली. आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या. मार्गदर्शनाचा फायदा झाला ^सीईओसारख्या अधिकाऱ्यांनी स्वतः आमच्या झोपडीत यावे. हे इतिहासात पहिल्यांदाच झाले. त्यासाठी त्यांचे मनोमन धन्यवाद. या भेटीत त्यांनी आरोग्यविषयक अनेक सूचना केल्या. त्या मार्गदर्शनाचा भविष्यात फायदाच होणार आहे. आता फक्त अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी घरकुल, पट्टे वाटप, रोजगार, शिक्षण अशा मेळघाटातील इतर समस्यांकडे ही लक्ष द्यावे. -प्रकाश उईके, नागरिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *