Headlines

3 वेळा कर्जमाफी झाली, तरी माझं नाव नाही!:नांदेडमध्ये शेतकऱ्याने रेकॉर्ड केला अखेरचा व्हिडिओ; आत्महत्येवरून रोहित पवारांचा सरकारवर संताप




राज्यावर ओढवलेले भीषण दुष्काळाचे सावट आणि नापिकीच्या चक्रव्यूहाने मराठवाड्यातील बळीराजाचे जगणे असह्य केले असताना, नांदेड जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नांदेड तालुक्यातील बोरगाव तेलंग येथील शेतकरी शंकर क्षीरसागर (वय 46 वर्षे) यांनी राज्य सरकारच्या एकाही कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्यामुळे आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक शुल्काचा ताण सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अत्यंत विदारक बाब म्हणजे, जीवन संपवण्यापूर्वी क्षीरसागर यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक मारत व्यवस्थेची पोलखोल केली आहे. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. कलेक्टर साहेब, 3 कर्जमाफी झाल्या तरी माझं नाव नाही! नांदेड शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव तेलंग येथे घडलेल्या या घटनेने प्रशासकीय दाव्यांचे धिंडवडे काढले आहेत. शंकर क्षीरसागर यांच्याकडे 5 एकर शेती होती. मात्र, दुष्काळ आणि सततची नापिकी यामुळे ते कर्जाच्या खाईत लोटले गेले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यासमोर हात जोडून नोंदवलेली व्यथा अशी… “हॅलो! कलेक्टर साहेब, मी विनंती करत आहे. राज्यात 3 वेळा कर्जमाफी झाली, तरी एकाही कर्जमाफीच्या यादीत माझं नाव आलं नाही. त्या निमित्तानं मी आत्महत्या करतोय. शासनानं माझ्या मृत्यूची गांभीर्यानं दखल घ्यावी.” मुलीच्या फी माफीचा पोकळ दावा “शासन सातत्याने सांगतं की दुष्काळात विद्यार्थ्यांना फी माफी आहे. माझी मुलगी शिवानी शंकर क्षीरसागर ही मेडिकलला (MBBS) शिकत आहे. आम्ही सर्व रीतसर अर्ज करूनही आम्हाला कोणतीही फी माफी मिळालेली नाही. कलेक्टर साहेबांना मी हात जोडून विनंती करतो की, गांभीर्यानं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी. मी एक शेतकरी म्हणून आत्महत्या करतोय… मी तुमच्यासारखाच माणूस आहे… चालतो!” हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर क्षीरसागर यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे आयुष्य संपवले. मुलगी पुण्यात MBBSला, मुलगा इंजिनिअरिंगला; स्वप्ने अपूर्ण, शेतकरी बापाचा अंत शंकर क्षीरसागर यांनी गरिबी आणि शेतीतील संकटांशी लढा देत आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षणासाठी पाठवले होते. त्यांची कन्या शिवानी पुण्यातील नामांकित खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेत आहे, तर मुलगा अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण घेत आहे. दुष्काळामुळे शेतातून कवडीचेही उत्पन्न निघत नव्हते. त्यातच मुलांचे लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर यामुळे क्षीरसागर प्रचंड मानसिक तणावाखाली होते. शासनाकडून फी माफी किंवा सवलत मिळेल ही त्यांची शेवटची आशाही प्रशासकीय दिरंगाईमुळे फोल ठरली. बळीराजाच्या सरणावर रोज सरकारच्या इज्जतीची राख होईल -रोहित पवार या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “नांदेड जिल्ह्यातील शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी केलेला हा व्हिडिओ मन सुन्न करणारा आहे. मुख्यमंत्री महोदय, या शेतकऱ्याची आर्त हाक कदाचित तुमच्या कानापर्यंत पोहोचेल, पण मनापर्यंत पोहोचेल की नाही हा अजूनही प्रश्नच आहे. परवा पत्रकार परिषदेत दुष्काळाचे प्रेझेंटेशन करताना ‘शिवार हेल्पलाईन’चे विनायक हेगाना यांनी वर्तवलेली भीती आणि आज पुढे आलेले हे वास्तव अत्यंत चिंताजनक आहे.” सरकारने डोळे उघडावेत “मायबाप सरकार, जर राज्यातील शेतकऱ्याला खरंच वाचवायचे असेल, तर अहंकार बाजूला ठेवून आमच्यासारख्या विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करा. अन्यथा बळीराजा असाच मरत राहील आणि त्याच्या सरणावर सरकारच्या इज्जतीची रोज राख होत जाईल! सरकारने अजूनही सुधारावे आणि शंकर क्षीरसागर यांच्या डोळ्यांतील पाणी आणि त्यांची आर्त हाक ते गेल्यानंतर तरी ऐकावी,” असा संतप्त इशारा रोहित पवार यांनी दिला. 5,000 रुपयांच्या अग्रिम मदतीवरून असंतोष वाढला राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अवघ्या 5,000 रुपयांच्या मदतीवरून राज्यभरात आधीच मोठा असंतोष खदखदत आहे. “शेतात पिके जळून खाक झाली असताना आणि लाखो रुपयांचे कर्ज असताना 5,000 रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची?”, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. —————————————————– हेही वाचा… नारायणगडावर आज मनोज जरांगे पाटलांचा भव्य दसरा मेळावा: शेकडो एकरवर जय्यत तयारी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष! मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांचा पारंपरिक दसरा मेळावा आज (मंगळवार, दि. 20) बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर शेकडो एकर विस्तीर्ण परिसरात प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत पार पडत आहे. आज सकाळी ठीक 10 वाजता मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून नारायणगडाच्या दिशेने प्रस्थान करणार असून, सकाळी 11 वाजता ते गडावर दाखल होऊन उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करतील. राज्यातील भीषण दुष्काळ, हतबल झालेला बळीराजा आणि राज्य सरकारने जाहीर केलेली अवघ्या 5,000 रुपयांची तुटपुंजी मदत या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज नारायणगडाच्या पवित्र व्यासपीठावरून कोणती निर्णायक भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *