![]()
“मी विधिमंडळात उभा राहिलो तर सरकारपेक्षाही मोठा ठरेन. शिक्षकांनी आणि पदवीधरांनी सत्ताधाऱ्यांची गुलामगिरी झुगारून मला एकदा संधी देऊन पाहावी. 27 ऑक्टोबरला मी जिंकून आलो आणि पुढील 12 महिन्यांत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर पुढच्याच वर्षी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी मी स्वतः आमदारकीचा राजीनामा देईन,” असा थेट आणि खळबळजनक शब्द नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले यांनी दिला आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिजीत बिचुकले यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर अत्यंत गंभीर राजकीय व कौटुंबिक आरोप करत संपूर्ण निवडणुकीत नवा वाद निर्माण केला आहे. मैं खडा तो सरकार से बडा; 1 वर्षात काम नाही केले तर राजीनामा देणार! आपल्या खास शैलीत माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले, “मी एक वकील म्हणून बोलत असून संविधानाने वकिली करणाऱ्यांना शिक्षकाचा दर्जा दिलेला आहे. शिक्षकांनी कोणत्याही देवाभाऊंच्या भीतीला किंवा सत्ताधाऱ्यांच्या भेटवस्तूंच्या आमिषाला बळी पडू नये. प्रस्थापित नेत्यांनी आज जनतेला निम्मे गुलाम केले आहे, उद्या इंग्रजांसारखे संपूर्ण गुलाम बनवतील. ही गुलामगिरी मोडायची असेल तर मला विधान परिषदेत पाठवा.” 12 महिन्यांची मुदत “मी विठू माऊलीच्या चरणी विजयाचे दान मागितले आहे. 27 ऑक्टोबरला माझा निकाल लागून विजय झाला, तर मी पुढचे 12 महिने अविरत लढेन. 27 ऑक्टोबर पर्यंत काम करून शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत, तर मी स्वतःहून पदाचा राजीनामा देईन. मी खडा तो सरकार से बडा!” माझी पत्नी 8 महिन्यांची गरोदर असताना जेलमध्ये डांबले मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जुन्या घटनेचा संदर्भ देत बिचुकले यांनी अत्यंत गंभीर आरोप केला, “माझी पत्नी अलंकृता बिचुकले या स्वतः ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका (शिक्षिका) आहेत, त्यामुळे शिक्षकांच्या व्यथांशी माझा थेट जिव्हाळ्याचा संबंध आहे. 2011 मध्ये जेव्हा मी निवडणूक लढवत होतो, तेव्हा माझी पत्नी तब्बल 8 महिन्यांची गरोदर असताना केवळ राजकीय सूडबुद्धीतून तिला तुरुंगात ठेवण्यात आले होते.” देवाभाऊंवर निशाणा “असे कृत्य करणारे शिवेंद्रराजे भोसले वास्तविक पाहता जेलमध्ये असायला हवेत; मात्र देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) त्यांना शेपूट असल्यासारखे सोबत घेऊन फिरतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात. सत्ताधाऱ्यांनी महिला उमेदवारांना उमेदवारी दिली तरी शिवेंद्रराजेंसारख्या प्रवृत्तींना पाठिंबा देणाऱ्यांना शिक्षकांनी जाब विचारला पाहिजे.” शिवसेना नावावर पहिला अधिकार उदयनराजेंचा अन् माझा! राजकीय घडामोडींवर आणि ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष टोला लगावताना ते म्हणाले, “छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेना पक्षाची स्थापना झाली; त्यामुळे ‘शिवसेना’ या शब्दावर सर्वप्रथम कायदेशीर व नैतिक अधिकार कोणाचा असेल, तर तो छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आणि त्यांचे धाकटे बंधू म्हणून शिवछत्रपतींचा वैचारिक वारसा चालवणाऱ्या अभिजीत बिचुकलेचा आहे, हे मी यापूर्वीही ठामपणे मांडले आहे.” पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात एका बाजूला महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तीव्र चुरस असताना, अभिजीत बिचुकले यांनी थेट विठ्ठलाच्या दारात जाऊन घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि सत्ताधाऱ्यांवर केलेल्या बोचऱ्या आरोपांमुळे या निवडणुकीतील राजकीय रंगत आणखी वाढली आहे. —————————————————— हेही वाचा… नरेंद्र मेहतांची आमदारकी रद्द करा, प्रताप सरनाईकांची राज्यपालांकडे मागणी: म्हणाले- पत्रकारांवर हल्ला, मध्यरात्री महापालिका आयुक्तांच्या घरात घुसून ओलीस ठेवले! “मीरा-भाईंदर शहरात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर आणि सामान्य नागरिकांवर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांकडून भरदिवसा जीवघेणे हल्ले केले जातात. एवढ्यावरच न थांबता, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 250 ते 300 जणांचा जमाव मध्यरात्री एका तरुण आयएएस (IAS) महापालिका आयुक्तांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसतो, त्यांच्या पत्नी व लहान मुलांसमोर त्यांना तब्बल 3 ते 4 तास ओलीस (बंधक) ठेवतो आणि पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणतो. हा संपूर्ण प्रकार म्हणजे लोकशाहीची उघड हत्या आणि सत्तेचा नंगानाच आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदार नरेंद्र मेहता यांची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात यावी आणि घुसखोरी करणाऱ्या नगरसेवकांचे पद बरखास्त करावे,” अशी आक्रमक आणि खळबळजनक मागणी शिवसेना नेते तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मी निवडून आलो तर सरकारपेक्षा मोठा:एका वर्षात प्रश्न नाही सोडवले तर राजीनामा देईन; अभिजीत बिचुकलेंचा शिवेंद्रराजेंवर निशाणा