Headlines

नारायणगडावर होणारी गर्दी नगद नारायण महाराजांची!:गर्दी जमवून टेंडर लाटणारा हा 'टेंडर योद्धा'; अजय महाराज बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात




“बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात जमणारी गर्दी ही मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी नसून ती साक्षात नगद नारायण महाराजांची, वारकऱ्यांची आणि धर्माची गर्दी आहे. नारायणगडाची पवित्र गादी ही ब्रह्मचारी पदाची गादी असून, खोटेपणा करणाऱ्या माणसाला या गादीवरून बोलण्याचा अधिकार कोणी दिला? मनोज जरांगे हे मराठा समाजाचे ‘संघर्ष योद्धा’ नसून केवळ गर्दी दाखवून कोट्यवधी रुपयांची कंत्राटे लाटणारे ‘टेंडर योद्धा’ आहेत,” असा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार, संशयास्पद जमीन खरेदी, कौटुंबिक वाद आणि राजकीय दबावाचे गंभीर आरोप केले. तसेच या मेळाव्यात जरांगेंनी भाषणबाजी करण्याऐवजी समाजाला 10 मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे खुले आव्हान दिले. नारायणगडाच्या पवित्र गादीवरून बोलण्याचा अधिकार कोणाचा? मेळाव्याच्या ठिकाणावरून आक्षेप घेताना अजय बारस्कर म्हणाले, “नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी स्पष्ट करावे की, हा मेळावा जरांगेंचा आहे की नगद नारायण महाराजांचा? ही गादी ब्रह्मचारी परंपरेची आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ‘साच आणि मवाळ’ भाषेविरुद्ध जाऊन जाती-जातींत द्वेष पसरवणारी आणि शिवीगाळ करणारी भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला या गादीवर कोणी बसवले?” गर्दीचे भांडवल “जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी गैरसमज करून घेऊ नये. तिथे येणारे भाविक हे वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार गडाच्या दर्शनासाठी येतात. मात्र, याच गर्दीचा वापर करून सरकारवर दबाव आणायचा आणि स्वतःचे आर्थिक हितसंबंध साधायचे, हा जरांगेंचा जुना धंदा आहे.” बायको आणि वडिलांचा विश्वास नाही, समाज कसा विश्वास ठेवणार? जरांगेंच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून थेट कागदपत्रे सादर करत बारस्कर यांनी आरोप केले. “स्वतःला प्रामाणिक म्हणवणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा आणि वडिलांचाही विश्वास नाही. 2016 मध्ये जरांगेंच्या पत्नीने त्यांना न्यायालयात खेचले होते. कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय गेवराई येथे दाखल दावा क्रमांक 755/2016 (दाखल तारीख 29 जानेवारी 2016) नुसार, त्यांच्या पत्नीने मालमत्तेच्या वाटपाची मागणी केली होती आणि ‘माझा तुमच्यावर विश्वास नाही’ अशी भूमिका मांडली होती.” वडिलांचा अविश्वास “जरांगेंचे वडील लक्ष्मण जरांगे यांनी आपल्या मुलाला 1 गुंठा जमीनही दिली नाही, नातवांवर विश्वास दाखवला पण मनोजवर ठेवला नाही. ज्या माणसाला गावातून काढून दिले आणि जो सासुरवाडीला राहतो, त्याच्यावर मराठा समाजाने आंधळेपणाने कसा विश्वास ठेवावा?” असा सवाल त्यांनी केला. आंदोलनानंतर 27 एकर जमिनी कशा घेतल्या? जरांगेंच्या निकटवर्तीयांच्या आर्थिक संपत्तीवर बोट ठेवताना त्यांनी गंभीर मुद्दे उपस्थित केले. “आंदोलन सुरू होण्यापूर्वी आर्थिक चणचण सांगणारे जरांगेंचे निकटवर्तीय आज कोट्यवधींचे व्यवहार करत आहेत. जरांगेंचा सहकारी पांडुरंग तारख याने 27 एकर जमीन खरेदी केली. त्यांचा 21 वर्षांचा पुतण्या स्वास्तिक जरांगे, ओंकार जरांगे आणि इतर सहकाऱ्यांनी दुष्काळ असताना जमिनी कशा घेतल्या? हा जमिनी खरेदी करण्याचा नेमका फॉर्म्युला काय आहे, हे जरांगेंनी आजच्या दसरा मेळाव्यात गरीब मराठा तरुणांना सांगावे. जरांगेंकडे सोन्याची बिस्किटे असल्याच्या चर्चा आहेत. जर खरोखरच त्यांच्याकडे हे धन असेल, तर आत्महत्या केलेल्या 350 हून अधिक मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना त्यांनी हे वाटून टाकावे.” गर्दी जमवा आणि टेंडर मिळवा; हा ‘टेंडर योद्धा’ आहे! जरांगेंच्या कार्यपद्धतीची पोलखोल करताना बारस्कर म्हणाले, “जरांगेंची संपूर्ण यंत्रणा ही ‘सिंडिकेट’सारखी चालते. अधिकारी, जिल्हाधिकारी, आयपीएस आणि मंत्र्यांना जाहीरपणे शिवीगाळ करायची, भीतीचे वातावरण निर्माण करायचे आणि त्यातून 3,700 कोटी ते 5,400 कोटी रुपयांची समृद्धी महामार्ग, ऊर्जा खाते व जलसंधारण विभागाची कामे मिळवायची. हा मराठ्यांचा लढा नसून किशोर बलांडेचा ‘टेंडर लढा’, पांडुरंग तारखचा ‘जमीन लढा’ आणि मेहुण्याचा ‘वाळू लढा’ आहे.” विखे पाटलांसोबत ‘हम साथ साथ हैं’ “काही महिन्यांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जाहीरपणे दूषणे देणारे जरांगे आता त्यांच्यावर प्रेम करण्याचे आवाहन करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विखे पाटील, किशोर बलांडे आणि मनोज जरांगे यांनी मीडियाला बाहेर काढून बंद खोलीत नेमकी काय चर्चा केली आणि कोणती डीलिंग केली, याचा खुलासा करावा.” आजच्या भाषणाचे बारस्करांनी वर्तवले ‘अंदाज’ नारायणगडावरील आजच्या मेळाव्यात जरांगे काय बोलणार, याची खिल्ली उडवत बारस्कर म्हणाले, “जरांगे स्टेजवर येऊन कात्रीत बोट घालून नमस्कार करतील. गर्दी दिसली की आवेश आणतील आणि कमी दिसली की रडायला सुरुवात करतील. ‘मला चारी बाजूंनी घेरले आहे, मी काही दिवसांचा सोबती आहे’ असे भावनिक संवाद म्हणून सहानुभूती मिळवतील.” “त्यानंतर येवल्याचे, परळीचे नेते आणि सत्ताधाऱ्यांना शिव्या देतील. मात्र, मागच्या वर्षी त्यांनी दिलेला 1 महिन्याचा वेळ, शेतकऱ्यांसाठी घेतलेली भूमिका आणि 1 वर्षात संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीत घालण्याचे दिलेले आश्वासन यावर मात्र ते एक शब्दही बोलणार नाहीत.” आपण मांडलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रे सक्तवसुली संचालनालय (ED), प्राप्तिकर विभाग (Income Tax) आणि राज्य शासनाकडे सोपवले असून, जरांगेंच्या ढोंगाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण न्यायालयीन व रस्त्यावरील लढा सुरूच ठेवणार असल्याचे अजय बारस्कर यांनी शेवटी स्पष्ट केले. ————————————————————— हेही वाचा… नरेंद्र मेहतांची आमदारकी रद्द करा, प्रताप सरनाईकांची राज्यपालांकडे मागणी: म्हणाले- पत्रकारांवर हल्ला, मध्यरात्री महापालिका आयुक्तांच्या घरात घुसून ओलीस ठेवले! “मीरा-भाईंदर शहरात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर आणि सामान्य नागरिकांवर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांकडून भरदिवसा जीवघेणे हल्ले केले जातात. एवढ्यावरच न थांबता, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 250 ते 300 जणांचा जमाव मध्यरात्री एका तरुण आयएएस (IAS) महापालिका आयुक्तांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसतो, त्यांच्या पत्नी व लहान मुलांसमोर त्यांना तब्बल 3 ते 4 तास ओलीस (बंधक) ठेवतो आणि पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणतो. हा संपूर्ण प्रकार म्हणजे लोकशाहीची उघड हत्या आणि सत्तेचा नंगानाच आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदार नरेंद्र मेहता यांची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात यावी आणि घुसखोरी करणाऱ्या नगरसेवकांचे पद बरखास्त करावे,” अशी आक्रमक आणि खळबळजनक मागणी शिवसेना नेते तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *