Headlines

मी पक्ष बदलणार नाही, कायम राष्ट्रवादीसोबतच:भाजप प्रवेशाच्या केवळ अफवा, महायुतीत अर्थखाते राष्ट्रवादीकडेच राहिले पाहिजे- प्रताप पाटील चिखलीकर




मी भाजपमध्ये यावे, असे अनेक जणांना वाटत असेल; त्यातूनच माझ्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली असावी. पण, अनेक नेत्यांना असेही वाटते की मी भाजपमध्ये येऊ नये. पण भाजप प्रवेशासारखे काहीच नाही, मी पक्ष बदलणार नाही. ही माहिती ज्यांनी दिली, त्याची शहानिशा माध्यमांनी करायला हवी होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे. मी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनी माझ्यावर सख्या भावाप्रमाणे प्रेम केले. त्यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवारांनी नेतृत्व स्वीकारले आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मी कायम त्यांच्यासोबतच राहीन. प्रताप पाटील चिखलीकर पुढे म्हणाले, भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नांदेडमध्ये झाली आणि त्या बैठकीमध्ये माझ्या प्रवेशाच्या संदर्भात चर्चा झाली, असे वृत्त समोर आले. मी पक्ष बदलणार किंवा नाही, हे माझ्याकडून किंवा माझ्या सहकाऱ्यांकडून स्पष्ट झाले पाहिजे. पण दुर्दैवाने, मी काहीही न बोलताच तशा बातम्या समोर आल्या. माझ्या सहकाऱ्यांचा कोणताही गैरसमज होऊ नये, म्हणून मी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जातोय का, याविषयी खुलासा केला आहे. ज्या पक्षाच्या बैठकीत माझ्या प्रवेशाची चर्चा झाली, त्या पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधून हे वृत्त खरे आहे का, याची माहिती माध्यमांनी घ्यायला हवी होती. सरकारला शेतकऱ्यांवरील संकटाची जाणीव प्रताप पाटील चिखलीकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही आमच्या जिल्ह्यात काम करत आहोत. सरकारला शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची जाणीव आहे. लाडकी बहीण योजना आणि कर्जमुक्ती यांसारख्या योजना सरकारने राबवल्या आहेत. पण दुर्दैवाने दुष्काळाचे संकट ओढवले असून सरकार त्याचा मुकाबला करत आहे. यातून मार्ग नक्कीच निघेल. एका शेतकऱ्याने व्हिडिओ बनवून आत्महत्या केल्याच्या घटनेवर प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, शंकरराव यांनी जी आत्महत्या केली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांचा तो व्हिडिओ ऐकला. त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलायला नको होते, यातून मार्ग काढता आला असता. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. पण आता त्यांचा जीव परत येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी असे चुकीचे पाऊल उचलू नये, ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. राष्ट्रवादीला अर्थखाते मिळावे प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, महायुतीमध्ये अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहे आणि ते राष्ट्रवादीकडेच राहिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात योग्य निर्णय घेतील आणि सुनेत्रा पवार यांना अर्थखाते सुपूर्द करतील. पंढरपूरमधील काही सदस्य हे केवळ नावापुरतेच बोर्डावर आहेत, त्यामुळे नव्या सदस्यांना संधी दिली गेली पाहिजे, हे माझे स्पष्ट मत आहे. या विषयावर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तसेच, राज्यात ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढत आहे, ती एक चिंतेची बाब आहे. सरकार याकडे गांभीर्याने पाहत असून, श्रॉफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *