![]()
हिंगोली तालुक्यातील लोहरा शिवारातील जमीनीचे बनावट कागदपत्रे तयार करून जमीनीची खरेदी विक्री करणाऱ्या चौघांवर रविवारी ता. 19 रात्री उशीरा हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील लोहरा येथील शिवराम सोनटक्के याची लोहरा शिवारात गट क्रमांक 43 मध्ये शेत जमीन आहे. सदर जमीनीपैकी 78 आर शेत जमीन त्यांनी विक्रीसाठी काढली होती. मात्र आदिवासी बांधवांना जमीन विक्री करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानागी आवश्यक असते. सदर परवानगी न घेताच सोनटक्के याने ते आदिवासी नाही असे सांगत बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर सदर जमीनीची रामलखन साबळे (रा. पेडगाव) याला विक्री केली. सदर जमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतांना गजानन सोनटक्के (रा.लोहरा), शिवशंकर पद्मने (रा. सिरसम बुद्रूक) यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली. दरम्यान, सदर जमीनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ता. 6 जानेवारी 2022 रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय हिंगोली येथे झाले होते. त्यानंतर या प्रकरणात एका व्यक्तीने तक्रार केल्यानंतर या तक्रारीची चौकशी सुरु झाली होती. विभागीय दक्षता पथकामार्फत चौकशी झाल्यानंतर सदर जमीन विक्री करतांना सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून त्यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सह दुय्यम निबंधक कार्यालयास दिल्या होत्या. त्यावरून सह दुय्यम निबंधक दशरथ हंबर्डे यांनी रविवारी ता. 19 हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून हिंगोली शहर पोलिसांनी शिवराम सोनटक्के, रामलखन साबळे, गजानन सोनटक्के, शिवशंकर पद्मने यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, सुनील अंभोरे पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोलीत बनावट कागदपत्रांद्वारे आदिवासींची जमीन हडपण्याचा प्रयत्न:खरेदीदारासह चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल