Headlines

इंधन दरवाढीचा फटका स्कूल बस मालकांना:शाळा आठवड्यातून 3 दिवस भरवून उर्वरित 2 दिवस ऑनलाईन वर्ग घेण्याची मागणी




राज्यातील शाळा आठवड्यातून 3 दिवसच भरवा आणि उर्वरित 2 दिवस ऑनलाईन वर्ग सुरू ठेवा, अशी मागणी राज्यातील स्कूल बस संघटनेने केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्ट्यानंतर जून महिन्यात पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजेल. सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येईल. पण राज्यातील इंधन संकट दिवसागणिक अधिक गडद होत आहे. या पार्श्वभूमीवर स्कूल बस मालकांनी इंधन पुरवठा पूर्ववत होईपर्यंत नव्या शैक्षणिक वर्षात शाळा आठवड्यातून केवळ 3 दिवस भरवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, सध्या पेट्रोल – डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे जुन्या दरात स्कूल बसची सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शाळा एकाच सत्रात सुरू ठेवण्यात याव्यात. विशेषतः शाळा आठवड्यातून 3 दिवसच शाळा भरवा व 2 दिवस ऑनलाईन वर्ग सुरू ठेवा. राज्य सरकारने या प्रकरणी शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे 1 जूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच स्कूल बस क्षेत्राला तातडीने दिलासा देत अनुदान किंवा सवलत जाहीर करावी, अशी मागणी राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने म्हटले आहे. याद्वारे त्यांनी स्कूल बसचे भाडे वाढवण्याचेही संकेत दिलेत. नागपुरात स्कूल बसची भाडेवाढ होणार दुसरीकडे, पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीमुळे नागपूर स्कूल बस व स्कूल व्हॅन संघटनेने आपल्या सेवा शुल्कात तब्बल 10 ते 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामु्ळे यंदा जे पालक दरमहा 1 हजार भाडे देतात, त्यांना यापुढे 12 रुपये, तर 2 हजार रुपये भाडे देणाऱ्या पालकांना 2400 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही या इंधनदरवाढीमुळे निर्माण झालेल्या महागाईचा फटका बसणार आहे. शाळा 15 ऐवजी 26 जूनपासून सुरू होण्याचे संकेत दुसरीकडे, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत सध्या सूर्य कोपला आहे. अनेक ठिकाणी तापमानाने 45 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी 10 जूननंतरही विदर्भातील उष्णतेची लाट अशीच कायम राहिली, तर शाळा 15 जून ऐवजी 26 जून रोजी सुरू करण्याचे संकेत दिलेत. सरकार याविषयी विचार करत असल्याचे ते म्हणालेत. मागील 10 दिवसांत चारवेळा इंधन दरवाढ उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या 10 दिवसांत पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत तब्बल 4 वेळा वाढ झाली आहे. सोमवारी देशात चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली. त्यात पेट्रोल प्रति लीटर 2.61 रुपये, तर डिझेल 2.17 रुपयांनी महाग झाले. तत्पूर्वी, 15 मे रोजी राज्यात पहिल्यांदा इंधन दरवाढ झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलचे भाव 7.38 रुपयांनी, तर डिझेलचे भाव 7.09 रुपयांनी वाढले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *