![]()
“अजितदादा असताना आणि नसताना आजच्या बारामतीत जमीन-अस्मानाचा फरक जाणवत आहे. दादांनी बारामतीसाठी पुढील २० वर्षांचे नियोजन करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, मात्र आज त्यांची कमतरता पावलोपावली भासत असून बारामतीकर पोरके झाले आहेत,” अशा शब्दांत अजित पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचवेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या धिम्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. या घटनेला आज ४ महिने उलटून गेले आहेत. असे असले, तरी अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी धिम्या गतीने होत असल्याचा आरोप केला जात आहे. युगेंद्र पवार बारामती दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विमान अपघाताची रखडलेली चौकशी, बारामतीचा विकास आणि मंत्रिमंडळातील अर्थ खात्यावरून महत्त्वाची विधाने केली. नेमके काय म्हणाले युगेंद्र पवार? अजित पवारांच्या अपघाताच्या प्रकरणावर बोलताना युगेंद्र पवार यांनी प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढले. “अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची चौकशी जर इतक्या धिम्या गतीने होत असेल, तर सर्वसामान्य जनतेने न्यायासाठी कुणाकडे बघायचे? असा गंभीर प्रश्न आमच्या मनात निर्माण होत आहे”. असे युगेंद्र पवार म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. दादांनी दिलेले वैभव मेन्टेन करणे हीच आमची जबाबदारी बारामतीच्या विकासाबाबत बोलताना युगेंद्र यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. “दादा असताना आणि नसताना बारामतीत खूप म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. दादांनी एवढी विकासकामे इथे करून ठेवलीत, त्यांनी जनतेला एवढी सोयीसुविधा दिलेल्या आहेत की, पुढील २० वर्षांसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या गोष्टी दादांनी उपलब्ध करून दिले आहे. आमच्या सगळ्यांचे काम आणि जबाबदारी आहे की, दादांनी आम्हाला जेवढे दिलंय, ते आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित मेन्टेन केले पाहिजे. बारामती स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे. हीच दादांची इच्छा होती.” दादा दर शनिवारी आणि रविवारी बारामतीत असायचे, विकास कामांची पाहणी करायचे. कुठेतरी आता दादांची कमतरता आम्हा सगळ्यांनाच जाणवते. दादा जेव्हा होते आणि आता नाहीयेत हा जमीन आसमानाचा फरक आहे. बारामतीकर पोरके झालेत. आज जेव्हा आपण तालुक्यात येतो, तेव्हा त्याची जाण सगळ्यांनाच होते. बारामतीत येताना पूर्वीपेक्षा थोडे वेगळे वाटते,” असे युगेंद्र पवारांनी नमूद केले. अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळावे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा यांनी अर्थ खाते मिळाले नसल्यामुळे खंत व्यक्त केल्याची माहिती समोर आलेली आहे. याबाबत युगेंद्र पवार यांना विचारले असता ते म्हणाले, अर्थ खाते सुनेत्रा पवारांना दिलेच पाहिजे. कारण ते दादांकडे होते. आताच नाही तर बऱ्याच वर्षांपासून अजितदादा अर्थमंत्री होते. यावर्षीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यांनी मांडले असते, तर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम अजितदादांचा झाला असता. अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी ते खाते परत राष्ट्रवादी काँग्रेसला दिले पाहिजे. ते नक्कीच देतील, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
Source link
अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावर युगेंद्र पवारांचे प्रश्नचिन्ह:म्हणाले – चौकशी धिम्या गतीने होत असेल तर, लोकांनी कुणाकडे बघावे?