![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प, विविध अभियानं आणि राज्यासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती स्वतः फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे या बैठकींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर एक्सवर पोस्ट करत या भेटीबाबत माहिती दिली. आमचे नेते आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन मिळाले. राज्यातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारं असतं, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या भेटीत केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी मोठ्या निर्णयांबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, राज्यात सध्या कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. कांद्याच्या दरातील चढ-उतार, निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आहेत. दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्येही नाराजीचं वातावरण आहे. काही साखर कारखान्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांबाबत आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महायुती सरकारकडून दिल्ली पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. या बैठकीत कांदा आणि ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. कांद्याचा हमीभाव, निर्यातबंदी, ऊस दर आणि इतर कृषी विषयांवर केंद्र सरकारशी चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या काही प्रमुख मागण्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं चित्र आहे. पुढील 10 दिवसांत यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या राजकीय वातावरणही चांगलंच तापलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती संवेदनशील बनली आहे. अशा वेळी राज्यातील तीनही प्रमुख नेत्यांचा दिल्ली दौरा आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आगामी काही दिवसांत मोठ्या घोषणांची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता शेतकरी आणि राज्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कांदा आणि ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार का, केंद्र सरकार महाराष्ट्रासाठी कोणते मोठे निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुती सरकारकडून आगामी काही दिवसांत मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जात असल्याने दिल्लीतील या बैठका महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
Source link
दिल्ली दौऱ्यात फडणवीसांची मोठी मोहीम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट:कांदा-ऊस प्रश्नावर दिलासा शक्य; मांडल्या महत्त्वाच्या मागण्या