![]()
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता असे प्रतिपादन केले. सध्याचे परराष्ट्र धोरण फसले असून, मालदीवसारखा छोटा देशही भारताचे ऐकत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘नेहरू प्रणित भारताच्या विकासाचे प्रतिमान आणि त्याची प्रसंगिकता’ हा व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमात ॲड. शंकर निकम लिखित ‘भारताचा कोहिनूर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन, विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, लक्ष्मीकांत देशमुख, एम.एस. जाधव, रमेश आढाव उपस्थित होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांनी अध्यक्षस्थान भूषवले. डॉ. मुणगेकर म्हणाले की, शीतयुद्धाच्या काळात जग अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये विभागलेले असताना पं. नेहरूंनी स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखून तिसरी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे, हे समजलेला एकमेव नेता नेहरू होते, असेही त्यांनी नमूद केले. संसदीय लोकशाही, आर्थिक नियोजन, धर्मनिरपेक्षता आणि परराष्ट्र धोरण ही नेहरूंची वैशिष्ट्ये होती. त्यांना कल्याणकारी राज्य आणायचे होते. देशातील लोकांना एकत्र ठेवण्याची ताकद राज्यघटनेत आहे, ज्यात पं. नेहरू, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. नेहरूंवर रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव होता आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था शोषण करणारी असल्याचे त्यांचे मत होते. ते राजकारणी झाले नसते तर तत्त्ववेत्ते किंवा इतिहासकार झाले असते. नेहरू आणि आइन्स्टाइन यांच्यातील चर्चा त्यांच्या व्यासंग दर्शवते. त्यांनी प्रत्येक धर्मातील धर्मांधतेला विरोध केला. नेहरूंनी देशात ११७ संस्था उभारल्या, ज्यावर देशाची बांधणी झाली आहे. ‘नेहरूमुक्त भारत’ करण्यासाठी मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त केला, अशी टीका मुणगेकर यांनी केली. इराण आणि इस्रायल युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करतो आणि आपण अगतिकपणे पाहत बसतो, हे भूषणावह नाही, असेही त्यांनी नमूद केले.
Source link
नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता:सध्याचे परराष्ट्र धोरण फसले, मालदीवही भारताचे ऐकत नाही; डॉ. मुणगेकर यांची टीका