![]()
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज झालेल्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा बव्हंशी सोडवण्यात यश मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माहितीनुसार, 17 पैकी तब्बल 15 जागांवर आघाडीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये एकमत झाले. त्यात काँग्रेसने 8, उद्धव ठाकरे गटाने 4, तर शरद पवार गटाने 3 जागांवर दावा केला आहे. उर्वरित 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असली तरी, आघाडीत समन्वय राखत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतैक्य होणे हे सत्ताधारी महायुतीविरोधात एकजुटीचे संकेत देणारे मानले जात आहे. महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने 2 दिवसांपूर्वी आमची प्राथमिक चर्चा झाली होती. आज अंतिमतः जागावाटपाच्या अनुषंगाने बैठक झाली. 17 पैकी 15 जागांवर आमचे एकमत झाले आहे. 2 जागांवर आमची चर्चा सुरू आहे. पुढील 2 दिवसांत या 2 जागांवरही निर्णय होईल. नांदेड व नाशिक या 2 जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. यासंदर्भात 2 जागा वगळता इतर ठिकाणी जागावाटपाचा निर्णय झाला आहे. त्यात काँग्रेस चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा – गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव- बीड- लातूर, नागपूर या 8 जागांवर निवडणूक लढवेल. शिवसेना ठाकरे गट हा रत्नागिरी, जळगाव, परभणी – हिंगोली व संभाजीनगर या 4 जागा लढवेल. राष्ट्रवादी (शरद पवार) हा पक्ष पुणे, ठाणे, सातारा- सांगली या 3 जागांवर लढणार आहे. एकंदरीत या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत. भाजपच्या घोडेबाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी व सुसंस्कृत सभ्यपणा टिकवून ठेवण्यासाठी या निवडणुकीत आम्ही आमच्या घटनात्मक मूल्यांचा व महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहोत. फडणवीस व्होट चोरीद्वारे मुख्यमंत्री झाले हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, या निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च होणार आहेत. बॅगाच्या बॅगा, पोतेच्या पोते, ट्रकच्या ट्रक भरून पैसा ओतला जाणार आहे. पैसा फेक तमाशा देख हा तमाशा सुरू आहे. अनेक ठिकाणी 5 लाख रुपये अॅडव्हान्स देऊन नगरसेवकांना उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पैशाच्या वापरात व घोडेबाजारात सत्ताधारी पक्ष केवळ विरोधी पक्षच नव्हे, तर आपल्या मित्रपक्षांचे मतदारही पळवत आहेत. एवढेच नाही तर स्वतःच्या लोकांनाही पैसे दिल्याशिवाय चालणार नाही इथपर्यंत हा घोडेबाजार चालला आहे. 2014 साली देवेंद्र फडणवीस व्होट चोरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले होते. जनतेला भाजपची दंडेलशाही रोखण्याचे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी जनतेला भाजपची दंडेलशाही रोखण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, आत्ता या घोडेबाजाराच्या माध्यमतून ते त्यांची सत्ता टिकवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीने बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हे चित्र निर्माण केले आहे. ही तीव्र चिंतेची गोष्ट आहे. निवडणुका येतील आणि जातील, पण महाराष्ट्रातील जनतेला लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही साद घालत आहोत. आपण हा प्रकार खपवून घेणार आहोत का? असाच प्रकार सुरू ठेवायचा का? हा माझा संतप्त सवाल आहे. आपण सर्वजण मिळून भाजपची दंडेलशाही व हुकूमशाही रोखू, असेही हर्षवर्धन सपकाळ यावेळी बोलताना म्ह्णाले.
Source link