Headlines

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी दिग्गज मैदानात:उबाठाचे अंबादास दानवे यांनी भरला उमेदवारी अर्ज




छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, जिल्ह्यातील दिग्गजांनी थेट निवडणूक मैदानात उडी घेतली आहे. या हायव्होल्टेज निवडणुकीसाठी उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनी संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, भाजप आणि महायुतीनेही या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गुरुवारी (दि. 4) भाजपकडून राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी नगरसेवक राजू शिंदे आणि पुनमचंद बमणे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तत्पूर्वी, बुधवारी (दि. 3) कन्नडच्या आमदार संजना जाधव, मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन गाढे यांनीही आपले अर्ज भरले आहेत. सत्तारांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी आतापर्यंत ही जिल्हा बँक माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रभावाखाली मानली जात होती. मात्र, सत्तारांच्या वर्चस्वाला धक्का देत बँक आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने थेट सहकार मंत्री अतुल सावे यांनाच रिंगणात उतरवले आहे. परिणामी, ही निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता शिवसेना आणि भाजप यांच्यातील प्रतिष्ठेची आणि शक्तिप्रदर्शनाची लढाई बनण्याची चिन्हे दिसत आहेत. 21 संचालक पदांसाठी होणाऱ्या या ‘हायव्होल्टेज’ निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बँकेमार्फत 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक यावर्षी रंगतदार होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखांच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि एक लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क होतो. लोकसभा, विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून हक्काची ‘व्होट बँक’ मिळते. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखा आहेत. या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले जाते. त्याचबरोबर या बँकेचे जिल्ह्यात 1 लाख खातेदार आहेत. बँकेच्या माध्यमातून कृषी कर्जाचे वितरण केले जाते. त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांसाठी अर्थसाह्य केले जाते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांना मोठे महत्त्व आहे. बँकेचे संचालक असल्यास लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत हक्काचे मतदार मिळतात. भविष्यातील राजकारणासाठी राजकीय नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीला महत्त्व देतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *