![]()
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यातून इक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके नावाचा अट्टल घरफोडीचा आरोपी सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फरार झाला. या घटनेमुळे नागपूर शहर पोलीस दलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडा स्मशानभूमीतील पवन सूर्यवंशी हत्याकांड प्रकरणातील सात आरोपींसह इक्काला हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी लॉकअपमधील शौचालयात एक आरोपी गेल्यानंतर, इक्कानेही शौचाला जाण्याचा बहाणा केला. त्यामुळे तैनात लॉकअप गार्ड त्याला पोलीस ठाण्याच्या बाहेरील शौचालयात घेऊन गेला. याचवेळी इक्काने सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून तेथून पळ काढला. आरोपी अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. हुडकेश्वर पोलिसांनी लगेचच परिसरात तसेच नागपूर शहरातील प्रमुख नाक्यांवर नाकाबंदी लागू केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याने नागपूर पोलिसांच्या निष्काळजीपणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही गेल्या काही वर्षांतील नागपूरमधील आरोपींच्या पलायनाची तिसरी मोठी घटना आहे. यापूर्वी गुजरातमधून अटक केलेल्या एका आरोपीने सी.ए. रोडवरील हॉटेलमधून पलायन केले होते. तसेच, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून बिशन सिंग आणि सत्येंद्र गुप्ता यांच्यासह पाच कुख्यात गुन्हेगार बॅरेकच्या खिडकीचे गज कापून व भिंत ओलांडून पसार झाले होते. कोव्हिड काळात पॅरोलवर सुटलेले अनेक आरोपीही परतले नव्हते, त्यापैकी काही अट्टल आरोपींना चार वर्षांनंतर नुकतीच चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे.
Source link
हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यातून अट्टल घरफोड्या ‘एक्का’ फरार:नागपूर पोलीस दलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, यंत्रणा सतर्क