![]()
अनुसूचित जाती (एससी) आरक्षण उपवर्गीकरणाचा राज्य शासनाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने सोमवारी (२७ जुलै) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राज्य शासनाच्या एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजात संतापाची भावना आहे. राज्यभरात याविरोधात आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर रिपाइं (आठवले गट) ने आक्रमक भूमिका घेतली असून, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. निदर्शनानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलकांनी शासनाने गठीत केलेली बदर समिती रद्द करण्याची मागणी केली. तसेच, या समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा असेही म्हटले. जातीय जनगणना झाल्याशिवाय उपवर्गीकरण करू नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सध्याच्या अपुऱ्या माहितीच्या आधारे उपवर्गीकरण केल्यास केवळ एकाच समाजाचा विचार होऊन अनुसूचित जातीमधील उर्वरित ५८ जातींवर अन्याय होईल, असे निवेदनात नमूद केले आहे. या मुद्द्यामुळे बौद्ध, मातंग, चांभार, ढोर, भंगी, लोहार यांसह इतर ५९ अनुसूचित जातींमधील समाजात, विशेषतः बौद्ध व मातंग समाजात दुरावा निर्माण होत आहे. शासनाने या माध्यमातून समाजात दरी निर्माण करू नये, असे आवाहन आंदोलकांनी केले. सध्या उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण दलित, आंबेडकरवादी आणि अनुसूचित जातीतील समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध नोंदवत आहे. त्यामुळे शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा; अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिला. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी मराठवाडा राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, विजय मगरे, मराठवाडा संघटक अरविंद अवचारमल, मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप पाडमुख, युवक जिल्हाध्यक्ष राकेश पंडित, मराठवाडा संघटक लक्ष्मण हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोतकर, रवी जावळे, मधुकर चव्हाण, प्रशांत वाकडे, विशाल सोनवणे, राजू, संदीप सातदिवे (कन्नड), फकीरा भालेराव (खुलताबाद), के. के. जगताप (सिल्लोड), संदीप खोतकर (सोयगाव), बाळासाहेब त्रिभुवन, जे. के. अमराव (वैजापूर), सुखदेव सोनवणे, किशोर साळवे, काकासाहेब कोळशे (गंगापूर), जगन्नाथ साळवे, कृष्णा (पैठण), बापू खाजेकर, बाबासाहेब भरपूर, नितीन सूर्यवंशी, विकास राऊत, विश्वजीत काळे, शरद शेगावकर, बाळासाहेब नरवाडे, विशाल गायकवाड, चेतन सोनवणे, गजानन बागुल, ऋषी तुपारे, सागर गायकवाड, गजानन निकाळजे, प्रेम सोनटक्के, दिलीप बोर्डे, नितीन साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
एससी आरक्षण उपवर्गीकरणास रिपाइंचा विरोध:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; जातीय जनगणनेशिवाय उपवर्गीकरण नको मागणी