![]()
देशभरातील कलाकारांना विविध उत्सवांमधून कला सादर करण्याची संधी मिळते. मात्र, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील नामांकित व्यक्तींनी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलेला मिळणारी दाद त्यांचा आत्मविश्वास वाढवते, असे मत मथुराच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्यक्त केले. हेमा मालिनी ३८व्या पुणे फेस्टिव्हलनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात बोलत होत्या. यंदाचा फेस्टिव्हल पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे. यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, ज्येष्ठ नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांनाही ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. निधी अगरवाल यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला. सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या रणमर्द शिवाजी मंडळ आणि श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठानचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी आणि अध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कृष्णकुमार गोयल यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. हेमा मालिनी यांनी मराठीत ‘तुमच्या प्रेमळ शहरात येऊन मला आनंद झाला,’ असे म्हणत पुण्याशी असलेले आपले नाते सांगितले. त्या म्हणाल्या, “गेल्या ३० वर्षांपासून मी पुणे फेस्टिव्हलशी जोडलेली आहे. सुरेश कलमाडी यांनी मला या व्यासपीठावर कला सादर करण्याची संधी दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कला सादर केल्या आणि पुणेकर रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले.” त्या पुढे म्हणाल्या, “कलमाडी यांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले. देशातील अनेक दिग्गज कलाकार या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत, त्यामुळे या उत्सवाची दखल जगभर घेतली जात आहे.” मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “गणेशोत्सव कसा साजरा करायचा, यावर आज दोन विचारप्रवाह दिसतात. एक पद्धत म्हणजे मोठा डीजे, डॉल्बी, प्लाझ्मा आणि लेझर लावून उत्सव साजरा करणे. दुसरी परंपरा म्हणजे पुणे फेस्टिव्हलसारखा कला-संस्कृतीचा उत्सव साजरा करणे.” ते पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला सामाजिक आणि सांस्कृतिक आशयाचा गणेशोत्सव पुढे नेण्याच्या उद्देशाने सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची निर्मिती केली.
Source link
पुणे फेस्टिव्हलमध्ये मोहन जोशींना जीवनगौरव पुरस्कार:खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, मान्यवरांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे; सुरेश कलमाडींना फेस्टिव्हल अर्पण