![]()
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की, आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून ४ हजार ३९९ दिवस पूर्ण करत नवीन किर्तीमान स्थापित केला आहे. ४३९९ दिवस हा केवळ काळ नाहीये. हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळात लिहिला गेला, असा सुवर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ हा देशातील २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आल्याचा काळ आहे. देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जाळे तयार झाल्याचा हा काळ आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने मोठी भरारी घेत, जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नाव कमावले, तो हा सुवर्ण काळ आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला, तो हा काळ आहे. या काळात आत्मनिर्भर भारत तयार होताना आपण बघितला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवू शकलो. जो भारत संपूर्ण शस्त्रात्रे आयात करत होता, आज तो हजारो कोटी रुपयांचे शस्त्रात्रे निर्यात करतोय. भारताने युपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टम गेटवे जगाला दिला आणि जगातील ३० देश युपीआय वापरत आहेत, असा भारत मोदींनी उभा केला आहे, असे फडणवीस म्हणाले. भारताच्या तरुणाईच्या स्वप्नांना मोठे पंख देण्याचे कार्य मोदींनी या काळात केलेले आहे. म्हणूनच मला असे वाटते की, केवळ लाँगेस्ट सर्व्हिंग असे नाही, तर ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल. विकासही आणि विरासतही अशा पद्धतीने ज्यांनी कार्य केले, त्या पंतप्रधान महोदयांचे मनापासून आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलंय. आपले जवळपास १०० धरणे पूर्ण करण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारने मदत केली. महाराष्ट्रात वाढवन सारखे बंदर, हायवेज, मेट्रो, ट्रेनचे नेटवर्क, नवी मुंबईचे एअरपोर्ट, मेट्रो-३ असे अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येतील की जे केवळ कागदावर दिसायचे. पण प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Source link
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले:कागदावर दिसणारे प्रकल्प प्रत्यक्षात पाहायला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस