महाराष्ट्रात २०२०-२१ मध्ये १.०८ लाख गर्भपात झाले होते. २०२४-२५ मध्ये ही संख्या २.०७ लाखांवर पोहोचली. पाच वर्षांत यात तब्बल ९८ हजार (९१%) गर्भपात वाढले. याच काळात देशातील गर्भपातांची संख्या ५.३४ लाखांवरून ३.५१ लाखांनी (६७.२३%) वाढून ८.९३ लाख झाले आहेत
.
महाराष्ट्रात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा एकामागून एक पर्दाफाश होतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकार दप्तरी नोंद असलेल्या अधिकृत आकडेवारीचे ‘दिव्य मराठी’ने इनव्हेस्टिगेशन केले तर धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ३ वर्षांत महाराष्ट्रात सुरक्षित आणि अधिकृत गर्भपातांच्या संख्येत ९०% वाढ झाल्याचा सरकारने दावा केला आहे. प्रत्यक्षात ५ वर्षांत राज्यातील गर्भपातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.
एक्स्पर्ट डॉ.श्रीनिवास गडप्पा, ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ
गर्भपात वाढण्याच्या सात कारणांत सामाजिक दबाव
१. कायदेशीर गर्भपात केंद्रांत वाढ : सरकारी व अधिकृत केंद्रांची संख्या वाढल्याने अधिकृत गर्भपात वाढले. २. ‘ओव्हर द काउंटर’ गोळ्या: बाजारात सहज गोळ्या मिळू लागल्याने अतिवापर सुरू झाला. ३. वंशवाढीसाठी दबाव : वंशाला दिवा हवा म्हणून कौटुंबिक छळातून गर्भपाताचा मार्ग पत्करला. ४. कुटुंब नियोजन हुकले : कुटुंब नियोजनाची साधने अपयशी झाली. म्हणून अनियोजित गर्भ रोखले. ५. आर्थिक विवंचना : गरिबांना तिसरे अपत्य, विशेषतः मुलीच्या संगोपनाचा खर्च पेलवत नसल्याने ‘बाय चॉइस’ गर्भपात केला जातो. ६. आरोग्य समस्या, गर्भातील दोष : आधुनिक चाचण्यांमुळे गर्भातील दोष, व्यंग समजल्याने वैद्यकीय सल्ल्याने अधिकृत गर्भपात होतो. ७. लैंगिक अत्याचारातील बळी: लैंगिक अत्याचारानंतर काही मुलींवर गर्भपाताची वेळ येते.

तीन महिलांची व्यथा : ‘दिव्य मराठी’ने ३ गर्भपात केंद्रांतून गर्भपात केलेल्या ३ महिलांशी संवाद साधला. गोपनीयतेसाठी त्यांची नावे दिलेली नाहीत.
१.अपराधीपणाची भावना : आधी २ मुली, तिसरी नकोच होती. सासरच्या हट्टापुढे गर्भपात करावा लागला. तिला चेहरा येण्याआधीच पोटात मारून टाकले. २.माझा हक्क डावलला : स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीच्या जन्म रोखला, यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते? ३.गरिबीमुळे स्त्री जन्म नाकारला : गरिबीमुळे मला गर्भपात करावा लागला. आधी मीच गोळ्या घेतल्या. अंगलट आले तर हॉस्पिटलमध्ये पैसे देऊन केले.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील गर्भपात
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ४७४ अधिकृत गर्भपात केंद्रे आहेत. येथे गेल्या ५ आर्थिक वर्षांत गर्भपातांची संख्या सातत्याने वाढते आहे.